पुण्य मिळविण्यासाठी इतरांचे जीव धोक्यात

पुण्य मिळविण्यासाठी इतरांचे जीव धोक्यात

पुण्य मिळविण्यासाठी इतरांचे जीव धोक्यात
महापालिका "गंभीर'' नाहीच : कबुतरखाने, ढाबळी नागरीकांच्या जीवावर

पांडुरंग सरोदे
- सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २२ : नदीपात्रातील विसर्जन घाट, रस्ता पेठ, सारसबाग, विविध धार्मिक स्थळे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी "कबुतरखाने'', "ढाबळीं''वर कबुतर, पारव्यांचे थवे दिसत आहे. त्यांना अक्षरशः पोत्यांमधून खाद्य आणून टाकले जात आहे. स्वतःच्या पदरात "पुण्य'' पाडून घेण्यासाठी या पक्षांना खाद्य टाकून नागरीकांना श्‍वसनाचे विविध गंभीर आजार देत त्यांचे आरोग्य धोक्‍यात आणण्याचा प्रकार सुरु आहे. संबंधित गंभीर प्रकार काही जणांच्या जिवावरही बेतला आहे. असे असूनही महापालिका प्रशासन कबुतरांना, पारव्यांना खाद्य टाकणाऱ्यांवर गांभीर्याने कारवाई न करता त्यांचे अप्रत्यक्षरीत्या लाड पुरवित असल्याची सद्यस्थिती आहे.

मार्केट यार्ड परिसरातील धान्य विभागामध्ये धान्याची चढ-उतार करताना पडलेले धान्य खाण्यासाठी कबुतर, पारवे असे पक्षी दिसत होते. मात्र मागील काही वर्षांपासून मार्केट यार्ड परिसरापुरते मर्यादीत असणारे कबुतर, पारवे शहराच्या वेगवेगळ्या भागातील कबुतर खान्यापर्यंत पोचले आहेत. शहरातील शनिवार पेठ येथील नाना नानी पार्कसमोरील घाट, वृद्धेश्‍वर घाट, डेक्कन नदीपात्र, ओंकारेश्‍वरजवळील गणपती विसर्जन घाट यांसह पावर हाऊस चौक, रास्ता पेठ, कॅम्प परिसर, गुरुवार पेठ, सारसबाग, अप्पर इंदिरानगर, गंगाधाम चौक, बिबवेवाडी अशा विविध ठिकाणी, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी काही मोठ्या संख्येने कबुतरखाने आहेत. तेथे शहराच्या वेगवेगळ्या भागातील नागरीक येऊन पक्षांना मोठ्या प्रमाणात खाद्य घालतात. त्यामुळे तेथील कबुतर, पारव्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. काही उत्साही नागरीक कबुतरांच्या ठिकाणी लहान मुलांना नेऊन खाद्य टाकण्याचा प्रकार करतात, तर काही जण छायाचित्र, चित्रीकरणासाठी त्याचा वापर करीत आहेत.

नागरिकांना उद्भवतो आजार
सार्वजनिक ठिकाणीच नव्हे, तर सोसायट्यांच्या आवारातही संबंधित पक्षांचे वास्तव्य वाढू लागले आहे. या पक्षांच्या विष्ठेमुळे, अस्वच्छतेमुळे दमा, फुफ्फुसाचे विकार यांसारखे आजार नागरीकांना उद्‌भवत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. विशेषतः न्यायालयानेही अशा प्रकारे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देऊनही त्याचे महापालिकेकडून पालन होत नसल्याची सद्यस्थिती आहे. तसेच कारवाईबाबतचे फलक, संपर्क क्रमांकही कुठे दिसून येत नाहीत.

खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई नाही
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागास येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागाने महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांना "सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य उपविधी २०१७''च्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याबाबत पत्र पाठविले. मात्र क्षेत्रिय कार्यालयांकडून संबंधित पत्रालाही केराची टोपली दाखविली. आत्तापर्यंत कल्याणीनगर आरोग्य कोठी येथे एका नागरीक वगळता आत्तापर्यंत कुठलीही कारवाई महापालिकेकडून झालेली नाही.

वस्त्या, टेकड्यांवर कबुतरांच्या "ढाबळ''
एकीकडे शहरात विविध ठिकाणी कुबतरखाने तयार होऊ लागले असतानाच शहरातील वस्त्या, टेकड्या, डोंगर उतारावर कबुतरांच्या "ढाबळ'' तयार होऊ लागल्या आहेत. अशा ढाबळी गुन्हेगारीचे केंद्र बनत असूनही महापालिका व पोलिस प्रशासनाकडून त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. याऊलट स्थानिक नागरीकांच्या आरोग्याच्या प्रश्‍नासह गुन्हेगारांचाही त्रास होऊ लागल्याची सद्यस्थिती आहे.

"कबुतरांना खाद्य टाकल्याच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित ठिकाणी कारवाई करण्याचे पत्र सर्व क्षेत्रिय कार्यालयांना पाठविण्यात आले आहे. संबंधित विभागांना कबुतर, पारवे मोठ्या संख्येने असणाऱ्या "क्रॉनिक स्पॉट''ची माहितीही देण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र अशा खाद्य टाकणाऱ्यांवर ५०० रुपयांची दंडात्कम कारवाई होते.''''
- डॉ.सारिका फुंडे, मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी

"कबुतर, पारवा अशा पक्षांच्या विष्ठेतुन व पंखांमधून पडणाऱ्या घाणीमुळे श्‍वसनाचे आजार निर्माण होतात. फुफ्फुसाला सुज येण्यापासून ते ॲलर्जीमुळे "हायपर सेन्सिटीव्हीटी न्युमोनिया''सारखा आजार होऊन जीव जाण्याचाही धोका उद्‌भवतो. ३ वर्षांपुर्वी एका २० वर्षीय तरुणाचा मृत्युही झाला आहे. नागरीकांनी अशा प्रकारांपासून दुर राहावे.'''' - डॉ.नितीन अभ्यंकर, प्रमुख, छातीविकार विभाग, पुना हॉस्पिटल.

"कबुतर, पारवे यांना खाद्य टाकण्याचा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे त्यांची नैसर्गिक सवय मोडून ते दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. त्यांच्यामुळे नागरीकांना आजार होतात, अनेकदा त्यांच्या थव्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडतात.''''
- बाळासाहेब ढमाले, पक्षीमित्र


अशी घ्या काळजी
- कबुतरखाने, ढाबळी यांच्यापासून दूर रहा
- लहान मुले, वृद्ध, रुग्णांना कबुतरांजवळ नेऊ नका
- खाद्य टाकणाऱ्यांना समजावून सांगा
- महापालिका, क्षेत्रिय कार्यालयांना माहिती द्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com