पुणे ठरले देशातील दुसरे हरित शहर

पुणे ठरले देशातील दुसरे हरित शहर

अक्षता पवार ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २२ ः महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या आणि सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या पुण्याची ख्याती आता जगभर होत आहे. ग्रीन सिटी इंडेक्समध्ये ‘प्लॅटिनम रॅंकिंग’ मिळाल्याने देशातील दुसरी ‘ग्रीन सिटी’ म्हणून पुण्याला प्रमाणित केले आहे. ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग काउंसिल’ने (आयजीबीसी) पुण्याला ‘प्लॅटिनम रॅंकिंग’ जाहीर करत प्रमाणपत्र दिले आहे.

याबाबत शहर नियोजन तज्ज्ञ अनघा परांजपे-पुरोहित यांनी सांगितले की, ‘‘ग्रीन सिटी इंडेक्समध्ये प्लॅटिनम, गोल्ड आणि सिल्व्हर अशा तीन प्रकारात रेटिंग दिले जातात. त्यात पुण्याला प्रथमच प्लॅटिनम रेटिंग मिळाला आहे तर ही देशातील दुसरी ‘ग्रीन सिटी’ म्हणून प्रमाणित केली आहे. त्या आधी राजकोट शहराला हा मान मिळाला आहे. पुणे महापालिकेने ग्रीन सिटी इंडेक्सच्‍या रेटिंगसाठी आवश्‍यक त्या निकषांच्या पूर्ततेसाठी केलेल्या कामांची माहिती जमा केली होती व ती आयजीबीसीला सादर केली. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरानेही अर्ज केला असून लवकरच त्यालाही रेटिंग प्राप्त होईल.’’

शहरीकरण, विकास कामांमुळे पर्यावरणाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दशकांमध्ये शहरांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटी, शाश्‍वत शहर अशा विविध संकल्पना राबविण्यात येत आहेत. त्यातच आता प्रदूषण, हवामान बदल, शाश्र्वत वाहतूक व्यवस्थेची कमतरता आदींना पाहता यामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘ग्रीन सिटी इंडेक्स’ या संकल्‍पनेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे उपलब्ध झाली आहेत, ज्याच्या माध्यमातून माहिती गोळा करणे सोपे झाले आहे.
- सुलक्षणा महाजन,
नगर नियोजन शास्त्राच्या अभ्यासक व आर्किटेक्ट

काय आहे ग्रीन सिटी इंडेक्स ?
ग्रीन सिटी इंडेक्‍समध्‍ये शहरांच्या आठ ते नऊ श्रेणींमधील सुमारे ३० घटकांचे मोजमाप केले जाते. यामध्ये ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड, जमिनीचा वापर, वाहतूक, पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, हवेची गुणवत्ता, पर्यावरणीय प्रशासन आदींचा समावेश असतो. या श्रेणीतील विविध घटकांच्या आधारे शहराला गुण देत त्यांचा ग्रीन सिटी इंडेक्स ठरविला जातो. पर्यावरणाच्या अनुषंगाने शहराची कार्यप्रणाली, रचना आदींसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ग्रीन सिटी इंडेक्स कोण मोजते?
इंडियन ग्रीन बिल्डिंग काउंसिल (आयजीबीसी) ही साधारणपणे २००८ पासून कार्यरत आहे. आयजीबीसीच्या माध्यमातून हरित इमारतींच्या रेटिंग प्रणालीचे काम सुरू होते. आयजीबीसीने प्रथमच ग्रीन सिटी इंडेक्ससाठी निकषांची यादी तयार केली असून त्यानुसार शहरांचा दर्जा ठरविला जात आहे. त्याची प्राथमिक चाचणी देशातील काही शहरांमध्ये होत आहे. त्यात पुण्यानेही अर्ज केले होते व पुण्याला चांगले गुण प्राप्त झाले. आयजीबीसीद्वारे याकरिता समिती नेमली जाते व त्या समितीद्वारे सर्व निकषांची मोजमापणी केली जाते.

कसा मोजला जातो?
ग्रीन सिटी इंडेक्ससाठी ‘आयजीबीसी’द्वारे निश्‍चित केलेल्या निकषांची पाहणी करण्यासाठी संबंधित शहराला त्‍या निकषांप्रमाणे केलेल्या कामांचा पुरावा सादर करावा लागतो. त्या सर्व कामांचा आढावा, त्याची प्रत्यक्ष पाहणी आयजीबीसीद्वारे केली जाते. त्यानंतर या निकषांना गुण देत त्या आधारे ग्रीन सिटी इंडेक्सचे रेटिंग दिले जाते.

प्लॅटिनम रेटिंगसाठी निकष
- पर्यावरण आणि संवर्धन
- नागरिकांचे कल्याण
- जमीन वापराचे नियोजन
- शहरातील वाहतूक व्यवस्था
- पायाभूत सुविधा व्यवस्थापन
- नावीन्य

प्रमुख घटकांना मोजले जाते ः
- पर्यावरणीय प्रशासन
- हवेची गुणवत्ता
- पाणी

- कचरा आणि जमीन वापर
- वाहतूक
- इमारती
- ऊर्जा
- कार्बन डायऑक्साईड

असा हवा लोकसहभाग
- पर्यावरण संवर्धनाबाबत जाणीव असलेली नागरिक व्यवस्था
- कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करत व्यवस्थापनासाठी मदत करणे
- शाश्र्वत विकासावर आधारित प्रकल्पांना महत्त्व देणे
- महिलांचा मोठा सहभाग हवा
- सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यावर नागरिकांनी भर देणे
- सार्वजनिक स्वच्छताविषयक उपलब्ध सुविधांचा योग्य पद्धतीने वापर
- सौर ऊर्जा, जलपुनर्भरण आदींचा सोसायटी व घरांमध्ये वापर
- नागरी सहभागातून प्रदूषण कमी करण्याचे नियोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com