शेतकऱ्यांनी खतांचा समतोल वापर करावा

शेतकऱ्यांनी खतांचा समतोल वापर करावा

पुणे, ता. २१ : राज्यात आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी २१ लाख ३१ हजार मेट्रिक टन इतका रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे खरीप हंगामात रासायनिक खतांचा तुटवडा भासणार नसल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. २१) सांगितले. शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालानुसार खतांचा समतोल वापर करावा,असे आवाहनही त्यांनी केले.

सध्या उपलब्ध असलेल्या एकूण रासायनिक खतामध्ये युरिया ५ लाख ३३ हजार मेट्रिक टन, डी.ए.पी. २ लाख १५ हजार मेट्रिक टन, पोटॅश २९ हजार मेट्रिक टन, सर्व संयुक्त खते मिळून ८ लाख ३९ हजार मेट्रिक टन आणि सुपर फॉस्फेट ५ लाख १५ हजार मेट्रिक टन आदींचा समावेश आहे. सध्या उपलब्ध असलेला खतांचा साठा हा राज्याच्या खरीप हंगामातील गरजेच्या जवळपास ५० टक्के आहे. तसेच खरिपासाठी राज्याला आणखी ४३ लाख १३ हजार मेट्रिक टन इतका रासायनिक खतांचा साठा उपलब्ध होणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला माती तपासणी अहवालाप्रमाणे खताची मात्रा देणे आवश्यक आहे. प्रमाणापेक्षा अधिक खत दिले तर, आपला खर्च तर वाढतोच, परंतु पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासून उत्पादन घटते. आवश्यक ते खत न मिळाल्यास उत्पादन आणि गुणवत्ता घसरते. रासायनिक खतांसोबत कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खत (बायोफर्टिलायझर्स), नॅनो युरिया यांचाही आवश्यकतेप्रमाणे वापर करणे आवश्यक आहे.


‘शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषिक ॲप’
राज्याच्या कृषी विभागाने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खास ‘कृषिक ॲप’ तयार केले आहे. या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना माती तपासणी अहवालानुसार प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या खतांची मात्रा आणि त्यासाठी लागणारी किंमत समजण्यास मदत होणार आहे. शिवाय आपल्या तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रात कोणकोणती खते उपलब्ध आहेत, याचीही माहिती कळू शकणार आहे. यामुळे खत खरेदी करणे सोपे होणार आहे. असे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी
सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com