वाहतूक व्यवस्थेत चांगले बदल होतील ः पोलिस आयुक्त रितेश कुमार

वाहतूक व्यवस्थेत चांगले बदल होतील ः पोलिस आयुक्त रितेश कुमार
Published on

पुणे शहर पोलिस आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने पुण्यात रविवारपासून (ता. २३) वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमाला ‘सकाळ माध्यम समूहा’चे सहकार्य लाभले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक समस्या आणि उपाययोजनांबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी अनिल सावळे यांनी केलेली खास बातचीत...

प्रश्न : पुण्यात पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. ही परिस्थिती सुधारण्याबाबत काय करावे लागेल?
रितेश कुमार : देशात सर्वाधिक ४० लाख वाहने पुण्यात आहेत. पायाभूत सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्न करीत आहे. शहरात मेट्रो, उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीबाबत नागरिकांची तक्रार असणे स्वाभाविक आहे. वाहतूक पोलिस, महापालिका आणि पीएमआरडीए यांचा योग्य समन्वय आहे. चार महिन्यांपासून वाहतूक व्यवस्था सुधारण्याबाबत चांगले प्रयत्न सुरू आहेत. सिग्नल चौक आणि रोड पेट्रोलिंगवर जास्तीत जास्त वाहतूक पोलिस राहावेत, असा आमचा प्रयत्न आहे. परंतु आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे.

प्रश्न : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकासह इतर प्रमुख रस्त्यांवर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. अवजड वाहतुकीमुळे अपघात वाढले आहे. याबाबत काय उपाययोजना करीत आहात?
उत्तर : वाहनांची वर्दळ असलेल्या सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या कालावधीत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्याबाबत सर्व पोलिस ठाणी आणि वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात येतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोचे काम सुरू असून, सहा ते आठ महिन्यांत ते पूर्ण होईल. पर्यायी एकेरी मार्ग केले असून, तेथील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी कमी झाली आहे.

प्रश्न : शहरात ४० हून अधिक अपघातप्रवण ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी वारंवार अपघात होऊन लोकांचे बळी जात आहेत. त्यासाठी काय उपाययोजना करीत आहात?
उत्तर : शहरात २०२१ मध्ये अपघातांमध्ये ८४ जणांचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये त्यात वाढ होऊन अपघातांत १०७ जणांचा बळी गेला. ‘ब्लूमबर्ग’ संस्थेच्या मदतीने मुंबई आणि दिल्लीत अपघातांत घट झाली आहे. या धर्तीवर पुणे पोलिसही ‘ब्लूमबर्ग’ संस्थेच्या मदतीने काम करीत आहेत. अपघातप्रवण ठिकाणांवर पायाभूत सुविधा सुधारण्यासोबतच वाहतूक व्यवस्थेत काही बदल करावे लागतील. एक-दोन महिन्यांत त्याठिकाणी प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होईल.

प्रश्न : वाहतूक नियमनासोबतच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना सीसीटीव्हींची मदत होत आहे. मात्र, शहराचा विस्तार वाढल्याने काय प्रयत्न सुरू आहेत?
उत्तर : पुण्यासारख्या शहरात सध्या सीसीटीव्हींची संख्या कमी आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. याशिवाय, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आणि ऑटोमॅटिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे जूनपासून १२५ जंक्शन कव्हर करीत आहोत. भविष्यात वाहतूक व्यवस्थेत निश्चितच चांगले बदल दिसून येतील.


पुणे शहर पोलिस आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित अभियानामुळे वाहतूक नियमांबाबत जागृती होण्यास मदत होईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. हे जनजागृती अभियान नागरिकांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’चे सहकार्य लाभले आहे.
- रितेश कुमार,
पोलिस आयुक्त, पुणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Amitesh Kumar, Vinaykumar Chaube and Varsha Kedar Chaudhary
Nagpur Ganeshotsav 2026
solapur cp office
Pune Infrastructure Update CM Pushes HCMTR Ring Road and Patal Lok Tunnel Projects for Faster Completion
Marathi News Esakal
www.esakal.com