छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार

छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार

आकाशदर्शन
- डॉ. प्रकाश तुपे

या महिन्यात चंद्रग्रहण होत असून ते ‘छायाकल्प’ प्रकारचे असेल. या ग्रहणात चंद्राचा प्रवास पृथ्वीच्या दाट छायेतून न होता विरळ छायेतून होतो. यामुळे नेहमी डोळ्याने दिसू शकणारे ग्रहणाचे आविष्कार न दिसता चंद्राचे तेज काहीसे कमी झालेले दिसते. सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीची शंक्वाकृती सावली अंतराळात पडलेली असते. या सावलीचा मध्यभाग हा दाट छायेचा व भोवतालचा भाग विरळ छायेचा किंवा उपछायेचा असतो. चंद्र पृथ्वीच्या दाट छायेऐवजी विरळ छायेतून गेल्यास छायाकल्प किंवा मांद्य प्रकारचे ग्रहण घडते. या ग्रहणात चंद्राचे तेज किंचितसे कमी झालेले दिसते.
शुक्रवारी (ता. ५ मे) रात्री ८.४४ वाजता चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेत शिरून ग्रहण सुरू होईल. जवळजवळ ४ तास १८ मिनिटांनी म्हणजे ६ मे रोजी पहाटे १.०१ वाजता चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून बाहेर पडून ग्रहण सुटेल. हे ग्रहण अंटार्क्टिका, आशिया, रशिया व आफ्रिकेतून दिसेल. ग्रहण काळात जेथे आकाशात चंद्र दिसत असेल तेथील सर्व भागात ग्रहण दिसेल. पृथ्वीवरील जवळजवळ ५७ टक्के लोकांना हे ग्रहण दिसू शकेल.

ग्रह :
बुध : महिन्याच्या तिसऱ्या‍ आठवड्यापासून बुध तेजस्वी गुरूच्या खालच्या बाजूस दिसू लागेल. यावेळी तो सूर्योदयापूर्वी जवळजवळ तासभर उगवेल. बुध क्षितीजावर उंच चढताना २९ तारखेला सूर्यापासून दूरात दूर अशा २५ अंशावर पोहचेल. यावेळी तो पहाटे साडेचारच्या सुमारास उगवेल व त्याची तेजस्विता ०.४ असल्याने अंधाऱ्या ठिकाणाहून सहज दिसू शकेल. पुढील आठवडाभर तो ठळकपणे दिसत राहील, कारण त्याची तेजस्विता उणे ०.९ पर्यंत पोहचेल.

शुक्र : पश्चिम क्षितिजावर सूर्यास्तानंतर तेजस्वी शुक्र दिसेल. या महिन्यात तो रात्री जवळजवळ साडेदहापर्यंत दिसत राहील. शुक्र महिन्याच्या प्रारंभी वृषभ राशीच्या शिंगाकडच्या भागात दिसत असून तो मिथुन राशीच्या रोखाने सरकत आहे. मिथुन राशीच्या पायाकडच्या भागाच्या परिसरात तो ९-१० मे च्या सुमारास दिसेल. शुक्र कॅस्टर व पोलक्स या ठळक ताऱ्‍याच्या रोखाने वर सरकत आहे. क्षितीजापासून जवळजवळ ४३ अंश उंचीवर शुक्र २६ मे रोजी पोहचेल. शुक्राची या वर्षातील क्षितीजावरची सर्वात जास्त उंची हीच असेल. यावेळी शुक्र उणे ४.३ तेजस्वितेने रात्री सव्वादहापर्यंत दिसू शकेल. महिनाअखेरीस शुक्र पोलक्स ताऱ्‍याच्या जवळ पोहचेल. यावेळी त्याचे बिंब अर्धप्रकाशित व २३ विकलांचे दिसेल. चंद्रकोरीजवळ शुक्र २३ तारखेला दिसेल.

मंगळ : सूर्यास्तानंतर तेजस्वी शुक्राच्या वरच्या बाजूस मिथुन राशीच्या परिसरात नारिंगी रंगाचा मंगळ दिसेल. तो कॅस्टर व पोलक्स ताऱ्‍याच्या रोखाने सरकत असून १४-१५ तारखेला या दोन ताऱ्‍यांच्या ओळीत मंगळ येईल. यानंतर तो कर्क राशीच्या रोखाने सरकत जाऊन महिना अखेरीस पुष्य नक्षत्रात म्हणजे ‘एम् ४४’ तारकागुच्छाच्या परिसरात पोहचेल. या महिन्यात मंगळ रात्री साडेअकरापर्यंत पश्चिम क्षितीजावर दिसत राहील. मंगळ आपल्यापासून खूपच दूर म्हणजे सूर्य-पृथ्वी अंतराच्या दुप्पट अंतरावर असल्याने त्याचे बिंब अगदी छोटे म्हणजे ५ विकलांचे व १.५ तेजस्वितेचे दिसेल. चंद्रकोरीजवळ मंगळ २४ तारखेला दिसेल.

गुरू : गेल्या महिन्यात गुरूची सूर्याबरोबर युती झाली होती. युतीनंतर गुरू पूर्व क्षितीजावर दाखल होत आहे. १५ मे नंतर तो पूर्व क्षितीजालगत दिसू लागेल. यावेळी तो सूर्योदयापूर्वी सुमारे दीड तास मीन राशीत दिसेल. महिना अखेरीस पहाटे पावणेचारच्या सुमारास गुरू उगवताना दिसेल. यावेळी त्याचे ३४ विकलांचे बिंब उणे २ तेजस्वितेचे दिसेल. चंद्रकोरीजवळ गुरू १७ मे रोजी दिसेल. या दिवशी कॅनडा, अमेरिका, मेक्सिको व उत्तर युरोप या देशातून चंद्राआड गुरू लपल्याचे दिसेल.

शनी : पहाटे दक्षिणपूर्व क्षितीजावर पिवळसर रंगाचा शनी दिसेल. तो मंद तेजाच्या ताऱ्‍यांनी बनलेल्या कुंभ राशीतील मध्य भागात दिसत आहे. महिन्याच्या सुरूवातीस पहाटे पावणेतीन वाजता उगवणारा शनी लवकर लवकर उगवत जात महिना अखेरीस एकच्या सुमारास उगवेल. या महिन्यात शनीचे १६ विकलांचे बिंब १ तेजस्वितेचे दिसेल. शनी भोवतालची कडी ८ अंशाने कललेली दिसतील.
दुर्बिणीतून पाहता शनीचा टायटन नावाचा ८.७ तेजस्वितेचा चंद्र सहज दिसेल. चंद्रकोरीजवळ शनी १३-१४ मे रोजी दिसेल.

युरेनस-नेपच्यून : येत्या १० तारखेला युरेनसची सूर्याबरोबर युती होत असल्याने या महिन्यात युरेनस दिसणार नाही. नेपच्यूनची युती गेल्या महिन्यात झाल्याने तो आता पूर्व क्षितीजावर दाखल झाला आहे. पहाटे शनीच्या अगोदर एक तास नेपच्यून उगवत असून तो ‘२० पीसीएम’ या ताऱ्‍याजवळ दिसत आहे. या ताऱ्‍याकडून तो पूर्वेकडे सरकताना मे महिन्यात दिसेल. त्याची तेजस्विता ७.९ असेल.

उल्कावर्षाव : कुंभ राशीतील ‘इटा अ‍ॅक्वारीडस’ नावाच्या उल्का ५-६ मे रोजी पडतील. हॅली धूमकेतूंच्या अवशेषांमुळे या उल्का दिसतात. साधारणपणे ताशी ५० उल्का पडताना दिसतात. मात्र यंदा चंद्रप्रकाशामुळे फारशा उल्का दिसणार नाहीत.

चंद्र : वैशाख पौर्णिमा ५ मे रोजी रात्री ११.०४ रोजी होईल तर अमावस्या १९ मे रोजी रात्री ९.२३ वाजता होईल. चंद्र पृथ्वीजवळ (३,६९,३४४ कि.मी.) ११ मे रोजी तर पृथ्वीपासून दूर (४,०४,५०८ कि.मी.) २६ मे रोजी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com