जन्मदात्रीने नाकारले; सावत्रआईने स्वीकारले!
आठ वर्षांच्या लेकराची ससेहोलपट अखेर थांबली; न्यायालयाच्या आदेशानंतर मिळाली जबाबदारी

जन्मदात्रीने नाकारले; सावत्रआईने स्वीकारले! आठ वर्षांच्या लेकराची ससेहोलपट अखेर थांबली; न्यायालयाच्या आदेशानंतर मिळाली जबाबदारी

पुणे, ता. २९ : सावत्रआईकडून मुलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या घटना आपण चित्रपटांमधून पाहतो. अनेकदा आपल्या सभोवतालीही अशा घटना निदर्शनास येतात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात सावत्रआई विषयीची ‘नकारात्मकता’ आपसूकच येते. पण पुण्यातील एका घटनेने त्यास छेद दिला आहे. जन्मदात्रीने आर्थिक कारणामुळे पोटच्या गोळ्याला सांभाळण्यास नकार दिल्याने अवघ्या आठ वर्षांच्या लेकराची ससेहोलपट सुरुच होती. अखेर सावत्रआईने त्या मुलाचा हक्क मिळावा म्हणून न्यायालयात दाद मागितली, अन्‌ न्यायालयानेही त्या मातृहृदयाची साद ऐकत मुलाच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर आनंदाने सोपविली!

मराठी, हिंदी अशा कोणत्याही चित्रपटामध्ये सावत्रआईची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने पुढे आणण्यात आली आहे. समाजात घडणाऱ्या सत्य घटनांचेच प्रतिबिंब अशा चित्रपटांमध्ये उतरल्याशिवाय राहत नाही. परंतु सावत्रआईबद्दलची नकारात्मकता पुसून टाकण्याचे काम पुण्यातीन घटनेने केले आहे. तर घटना अशी, की एका उच्चशिक्षित शासकीय अधिकाऱ्याचा पहिले लग्न झाले होते. त्याच्या दोन्ही मुली परदेशात स्थायिक झाल्या आहेत. वीस वर्षांनंतर या अधिकाऱ्याने पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेत दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीला मुलगा झाला. परंतु पुन्हा अधिकारी व त्याची दुसरी पत्नी यांची भांडणे सुरू झाल्याने त्याने तिच्यासमवेतही घटस्फोट घेतला. त्यावेळी त्यांचा मुलगा आठ वर्षांचा होता. एकाकी जीवन वाट्याला येऊ लागल्याने या अधिकारी महोदयांनी पुन्हा पहिल्या पत्नीसमवेत जवळीक साधली. हा गोंधळ इथेच संपत नाही. या अधिकाऱ्याची भागलपूर येथे बदली झाल्यानंतर कोरोनाकाळात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा, त्यांचा आठ वर्षांचा मुलगा पाचगणीमध्ये शिक्षण घेत होता. वडीलांच्या निधनामुळे त्याचा शाळेतील प्रवेशही रद्द करून घ्यावा लागला.

दरम्यान, या सगळ्या गोंधळामध्ये मुलाच्या जन्मदात्या आईने त्यांच्या मुलाला अधिकाऱ्याची पहिली पत्नी व त्याच्या मुलींनी पळवून नेले असून त्याचा ताबा द्यावा, अशी मागणी केली. तेव्हा, सावत्रआईने मुलाला त्याच्या जन्मदात्या आईकडे सोपविण्यास संमती दिली. परंतु, जन्मदात्या आईने अचानक आर्थिक कारण पुढे करून मुलाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. या सगळ्या घडामोडींमध्ये लहानग्याला आश्रमात ठेवण्याची वेळ आली. तेव्हा, सावत्रआईनेच पुढाकार घेत मुलाच्या पालकत्वाची जबाबदारी मिळावी, यासाठी ॲड. हेमंत झंजाड यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. ॲड. झंजाड यांनी या प्रकरणातील सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानुसार, जन्मदात्या आईनेच आर्थिक कारणामुळे मुलाला सांभाळण्यास असमर्थता दर्शवित मुलाच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी सावत्रआईला देण्यास मान्यता दिली. त्यामुळे न्यायालयामध्ये हा युक्तिवाद ग्राह्य धरून मुलाच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्या सावत्रआईकडे सोपविण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com