Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

Pune Villages : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेली २३ गावे ‘आगीतून फुफाट्यात’!

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेली २३ गावे २३ महिने उलटले, तरी अजूनही रस्ते, पाणी, सांडपाणी वाहिनी, वीज, कचरा यांसारख्या किमान पायाभूत सोई-सुविधांसाठी नागरिकांची गैरसोय होत आहे.
Summary

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेली २३ गावे २३ महिने उलटले, तरी अजूनही रस्ते, पाणी, सांडपाणी वाहिनी, वीज, कचरा यांसारख्या किमान पायाभूत सोई-सुविधांसाठी नागरिकांची गैरसोय होत आहे.

पुणे - खराब रस्ते, सांडपाणी वाहिन्यांचा अभाव, रस्त्यांना आलेले कचराकुंडीचे स्वरूप, पिण्याच्या पाण्यासाठी अद्यापही टॅंकरवर अवलंबून राहण्याची आलेली वेळ, विद्यार्थी, नोकरदारांची बससाठी होणारी गैरसोय, अशा असंख्य समस्यांचा सामना महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील नागरिकांना अजूनही करावा लागत आहे.

२३ गावे महापालिकेत समाविष्ट होऊन दोन वर्ष होत आली, तरीही नागरिकांना किमान सोई-सुविधांसाठी देखील अजून झगडावे लागत आहे. तर दुसरीकडे महापालिका, ‘पीएमआरडीए’कडून अजूनही गावांच्या विकासासाठी आवश्‍यक ‘सर्वंकष विकास आराखडा’ (डीपीआर) तयार झालेला नसल्याने संबंधित गावांचा विकास अजूनही अडखळतच सुरू आहे.

Pune Municipal Corporation
Pune Municipal : तृतीयपंथीयांना पुणे महापालिकेत मिळणार नोकरीची संधी; अशी असणार जबाबदारी...

महापालिकेमध्ये गावांचा समावेश झाल्यामुळे विकासाच्या दिशेने पाऊल पडत असल्याने नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात होता. मात्र गावे महापालिकेत येऊन २३ महिने उलटले, तरी अजूनही रस्ते, पाणी, सांडपाणी वाहिनी, वीज, कचरा यांसारख्या किमान पायाभूत सोई-सुविधांसाठी नागरिकांची गैरसोय होत आहे.

महापालिकेत समाविष्ट होऊन दोन वर्ष होत आली, तरीही सोई-सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

ही आहेत २३ गावे

पुणे महापालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाली, त्यानंतर जुलै २०२१ मध्ये जुलै २०२१ मध्ये म्हाळुंगे, सुस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, मंतरवाडी, होळकरवाडी, औताडे-हंडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली ही २३ गावे नव्याने महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली.

Pune Municipal Corporation
Pune Crime : चोरीच्या गुन्ह्यात अटक; फरासखाना पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये संपवले जीवन

अशी आहे स्थिती

१) पाणी - समाविष्ट गावांमधील गावठाणांमध्ये टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे, बहुतांश गावांमध्ये जलवाहिन्यांचा अभाव आहे. नव्याने झालेल्या सोसायट्यांना पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

२) कचरा - बहुतांश कचरा संकलन करण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र अजूनही रस्त्यांवर, शाळा,रुग्णालये, महामार्गांवर कचराकुंड्या तयार असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. महामार्गांवर कचऱ्यामुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत.

३) रस्ते - काही गावांचे अपवाद वगळता बहुतांश गावांमधील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पावसाळ्यात आणखी गंभीर समस्या होण्याची चिन्हे आहे. रस्त्यांवरील वाढलेले अतिक्रमण व खराब रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी ऐन रहदारीच्यावेळी वाहतूक कोंडी होत असून वाहतूक नियमनाकडेही दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे.

४) वाहिन्या - सांडपाणी, मैलापाणी वाहिन्या अजूनही झालेल्या नाहीत. मोठ्या सोसायट्यांमध्ये सेफ्टीक टॅंक आहेत, मात्र त्यांनाही मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.

सगळे प्रश्‍न तसेच

मांजरी बुद्रुक गावातील एक ते दीड हजार रहिवाशांनी काही महिन्यांपूर्वी महापालिकेवर मोर्चा काढला होता. महापालिकेने आवश्‍यक सोई-सुविधा तत्काळ पुरवाव्यात, नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन त्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी महापालिकेकडे केली होती. मात्र अद्यापही त्यांचे प्रश्‍न सुटले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.

मांजरी बुद्रुक येथील कचऱ्याचा प्रश्‍न सुटला आहे. त्याप्रमाणे नवीन गावांमधील कचरा घेतला जात आहे. त्यासाठी ८० नवीन वाहनेही घेतली आहेत. याबरोबरच सुविधा पुरविण्यासाठी आवश्‍यक अतिरिक्त मनुष्यबळही महापालिकेने घेतले आहे. प्रत्येक गावांच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मागील वेळी होता. ड्रेनेज, पिण्याचे पाणी यांचा डीपीआर तयार आहे. गावांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.

- कुणाल खेमनार, उपायुक्त, पुणे महापालिका

पाणी, वीज, कचरा यांसारख्या किमान पायाभूत सोई-सुविधांसाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. अजूनही टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे, नव्याने झालेल्या सोसायट्यांचा पाण्यासाठी सर्वाधिक खर्च होत आहे. कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्‍न सुटत नाहीत.

- नारायण चांदेरे, माजी सरपंच, सूस

आणखी अंत पाहू नका...

विनोबा भावे यांनी गीतेतील कर्मयोगावर प्रवचने देताना म्हटले आहे, ‘‘ज्या वेळेस लोक निराधार असतात, त्यावेळेस त्यांची सेवा करून त्यांना सुखी ठेवणे हा ओघप्राप्त धर्म आहे. आपल्या कुटुंबासाठी काही करताना आपला जो स्वार्थ असतो तितकाच स्वार्थ लोकसेवा करताना हवा.’’ म्हणून आपल्याला नेमून दिलेले काम व्यवस्थित होत नसेल तर आपले काही तरी चुकते हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे.

महापालिकेत समावेशानंतर आपल्या गावातील सगळ्या समस्या सुटतील अशी आशा बाळगून असलेल्या २३ गावांतील नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. दोन वर्षे झाली तरी अजून अनेक प्रश्‍न, समस्या संपलेल्या नाहीत. याबाबत आपले अनुभव व सूचना सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com