अतिरिक्त वीजमीटर उपलब्ध

अतिरिक्त वीजमीटर उपलब्ध

Published on

पुणे, ता. ६ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाकडून (पीएमआरडीए) जाधववाडी (सेक्टर १२) येथील प्रकल्पामध्ये मागेल त्यांना तत्काळ वीजजोडणी देण्यात येत असून नवीन वीजमीटरचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. या प्रकल्पातील सुमारे ४ हजार ८८५ घरांना नवीन वीजजोडणी देण्याचे नियोजन महावितरणकडून करण्यात आले आहे. त्यासाठी तब्बल २ हजार नवीन वीजमीटर अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध करून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या माहितीवर वीजग्राहकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, बुधवारी (ता. ५) पर्यंत नवीन वीजजोडणीचे २ हजार ७१९ अर्ज प्राप्त झाले असून, त्यातील २ हजार १०६ ग्राहकांना कोटेशन देण्यात आले आहे. कोटेशनच्या रकमेचा भरणा केलेल्या १ हजार ७७७ ग्राहकांकडे नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे.
‘पीएमआरडीए’कडून जाधववाडीमध्ये सेक्टर १२ मध्ये परवडणारी घरे उभारण्यात आली आहेत. त्याचा ताबा लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. आतापर्यंत ३ हजार १०० लाभार्थ्यांना घराचा ताबा देण्यात आला आहे. या घरांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी महावितरणकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी भोसरी गाव येथील शाखा कार्यालयात आणखी दोन अतिरिक्त कर्मचारी नेमून मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची तपासणी करून त्याची पूर्तता करून घेणे, कोटेशन देणे व त्याचा भरणा केल्यानंतर क्रमवारीनुसार नवीन मीटर उपलब्ध करून वीजजोडणी कार्यान्वित करणे आदी कार्यवाही करण्यात येत आहे.

येथे करा संपर्क
‘पीएमआरडीए’मधील ज्या लाभार्थ्यांना नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल, त्यांनी संबंधित घराचे ताबापत्र (अलॉटमेंट लेटर), ताबापत्रावरील व्यक्तीचे आधारकार्ड आदी आवश्यक कागदपत्रांसह भोसरी गाव कार्यालयाशी संपर्क साधल्यास पुढील सर्व कार्यवाही महावितरणकडून करण्यात येत आहे. कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीने वीजजोडणीचे आमिष दाखवून आर्थिक मागणी केल्यास त्यास लाभार्थ्यांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये. तसेच नवीन वीजजोडणीच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास शाखा अभियंता, भोसरी गाव व अतिरिक्त कार्यकारी अभियंता, भोसरी उपविभाग यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.