जिप शिक्षक

जिप शिक्षक

सेवानिवृत्त शिक्षकांनाच पाचारण
शिक्षकभरती लांबल्याने सरकारचा निर्णय

पुणे, ता. ८ : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु होऊनही अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने रिक्त पदांवर शिक्षकभरती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांनाच कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
नियोजित शिक्षक भरती उच्च न्यायालयातील रिट याचिकांमुळे लांबल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. यामुळे पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षकभरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत हा उपाय काढण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी शिक्षण संस्था, तसेच अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांमार्फत कंत्राटी तत्त्वावर तात्पुरती रिक्त शिक्षकीय पदे भरली जातील. ही प्रक्रिया राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण केली जाईल.
---
कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीच्या तरतूदी :
- नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष
- मानधन दरमहा वीस हजार
- जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक
- नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील अशा आशयाचे बंधपत्र/हमीपत्र आवश्यक
- प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र, इच्छुक उमेदवारांमधून अर्ज मागवून नियुक्ती आदेश देणार
- संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे अत्यावश्यक पदावर मिळणार नियुक्ती
- ही नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल
- नियुक्त्या १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करावी लागणार
- यावर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्याची सूचना
---
राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याकरिता हर तऱ्हेने प्रयत्न करण्यात येत आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांच्या अनुभवाचा फायदा शाळांना होईल आणि नवीन शिक्षक भरतीमध्ये सुद्धा त्याचा कोणताही अडसर होणार नाही, या दृष्टीने सध्या तात्पुरती सोय म्हणून ही प्रक्रिया करण्यात येत आहे.
- सूरज मांढरे, राज्याचे शिक्षण आयुक्त
---
सेवानिवृत्त होऊन अनेक वर्ष झालेले शिक्षक पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवा देण्यास तयार होतील का, याबाबत प्रश्न आहे. याशिवाय शिक्षण पद्धतीने काळानुरूप अनेक बदल होत आहेत, या बदलांशी जुळवून घेणे हे सेवानिवृत्त शिक्षकांना शक्य होणार आहे का..याशिवाय कंत्राटी पद्धतीने पुन्हा शिक्षक म्हणून तात्पुरते काम करताना देण्यात येणारे मानधनही खूप अल्प आहे. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने काम करण्यास तयार करण्याचे आव्हान असणार आहे.
- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com