ब्रह्मोस, अग्नी-६, मिसाइल लाँचरची माहिती पुरविली
सोशल मीडिया, ई-मेलवरून पाकिस्तानला माहिती

ब्रह्मोस, अग्नी-६, मिसाइल लाँचरची माहिती पुरविली सोशल मीडिया, ई-मेलवरून पाकिस्तानला माहिती

पुणे, ता. ८ : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर अँड डीई) या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे देशाच्या विविध सुरक्षा विषय प्रकल्पांची माहिती पुरविल्याचे दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात निष्पन्न झाले आहे.
‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या ब्रह्मोस, अग्नी ६, मिसाइल लाँचर, एमबीडीए या क्षेपणास्त्रांसह रुस्तुम, सरफेस टू एअर मिसाइल, इंडियन निकुंज पराशर या प्रकल्पांची आणि ‘डीआरडीओ’च्या कामांची माहिती दासगुप्ता हिला सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे पुरविली आहे. तसेच डॉ. कुरुलकर यांनी ‘डीआरडीओ’च्या संशोधन आणि विकास विभागाच्या सुरक्षा नियमावली संदर्भातील मयूरपंख प्रणालीचाही भंग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले डॉ. कुरुलकर यांना शुक्रवारी (ता. ८) न्यायालयात हजर करण्यात आले. शत्रू राष्ट्राला संरक्षण क्षेत्राची माहिती मिळाल्यास देशाच्या सुरक्षा व सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असा ठपका कुरुलकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. डॉ. कुरुलकर यांनी अधिकाराचा गैरवापर करून राष्ट्रीय सुरक्षा नियमांचा भंग करून ही माहिती हस्तांतर केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एटीएसने न्यायालयास सांगितले. डॉ. कुरुलकर यांची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हॉइस लेअर चाचणी करण्याच्या सरकारी पक्षाच्या मागणीसंदर्भात शुक्रवारी सुनावणी झाली. बचाव पक्षाने चाचणीला विरोध करून न्यायालयात अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाला चाचणीच्या आवश्यकतेबाबत म्हणणे सादर करण्याची सूचना केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जुलैला होणार आहे.

माहिती देण्यासाठी दुसरा मोबार्इल
अधिकृत मोबाईल क्रमाकांवरून ‘डीआरडीओ’ची गोपनीय माहिती देणे शक्य नसल्याने डॉ. कुरुलकर यांनी दुसरा मोबाईल खरेदी केला. या मोबार्इलमध्ये सर्व प्रकल्पांची माहिती पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या फाइलद्वारे घेतली. झारा दासगुप्ता हिने अग्नी-६, ब्रह्मोस यांची माहिती बिंगो चॅटडॉट नेट आणि क्लाउड चॅटडॉट नेटवर अपलोड करण्यास सांगून त्याच्या चित्रफिती पाठविण्यास सांगितल्या, असेही एटीएसच्या तपासात उघडकीस आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com