आम्ही लढायचे, तुम्ही चर्चा करायची!

आम्ही लढायचे, तुम्ही चर्चा करायची!

पुणे, ता. १० : ‘‘ते कधी राजीनामा देतात, आम्हाला सांगत नाहीत. कधी राजीनामा मागे घेतात, आम्हाला सांगत नाहीत. कधी दिल्लीबरोबर चर्चा करतात, आम्हाला सांगत नाहीत. निर्णय घेता आणि नंतर तळ्यात-मळ्यात करत बसता. त्यामुळे तुमची किती विश्वासार्हता राहते? आम्ही लढत रहायचे आणि तुम्ही मागून चर्चा करत बसायचे हे योग्य नाही,’’ अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर सोमवारी पलटवार केला.
‘‘आम्ही भाजपमध्ये नाही, तर त्यांच्या सोबत गेलो आहे. आणि समतेचा विचारही सोडलेला नाही’’, असेही ते म्हणाले.
अजित पवार यांच्यासमावेत एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रथमच समता भूमी येथे दर्शन घेण्यासाठी भुजबळ पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी समता परिषदेच्या वतीने भुजबळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ‘‘मला न विचारता ते सर्व काही करतात, आम्ही काय नुसतेच लढत बसायाचे का?’’, असा सवाल करून अप्रत्यक्षपणे पवार यांच्यावर विश्‍वासघात केल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, सुप्रिया सुळे यांची निवड, २०१४, २०१७ आणि २०१९ च्या झालेल्या राजकीय घडामोडींचा माहिती देऊन भुजबळ म्हणाले, ‘‘आम्ही जे सांगतो ते तुम्ही करत नाही. नंतर मात्र तुम्ही तेच करता. आम्ही काय विरोधक आहोत का, अनेकदा तुम्ही निर्णय घेता, मग तळ्यात-मळ्यात का करता. त्याचा परिणाम काय होतो, तर तुम्ही चर्चा करता आणि मी लढत बसतो.’’

समता परिषदेचे जे माझे विचार आहेत ते मी कधीही सोडणार नाही. ज्यांनी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या अपमान केला ते आता बाजूला झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रालयात फुले यांचे छायाचित्र, भिडेवाड्याच्या पुनर्विकास, आरक्षणाचा मुद्दा या मागण्या मान्य केल्या. जो माझे काम करेल, त्यांच्याकडून ते करून घेणे माझे काम आहे. नितीश कुमार यांच्यासह अनेक नेते भाजपबरोबरच युतीत गेले होते.
- छगन भुजबळ, मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com