नियुक्तीपत्र न मिळाल्याने तृतीयपंथीयांचा हिरमोड

नियुक्तीपत्र न मिळाल्याने तृतीयपंथीयांचा हिरमोड

Published on

पुणे, ता. १० ः महापालिकेच्या विविध विभागांमध्ये तृतीयपंथीयांना नोकरी देऊन सामाजिक दायित्व पार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिका प्रशासनाने तृतीयपंथीयांना महापालिका आयुक्तांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, आयुक्त बैठकीसाठी मुंबईला गेल्याने आणि महापालिका प्रशासनानेही आयुक्तांच्याच हस्ते नियुक्तीपत्र देण्याचा अट्टहास धरल्याने सोमवारी नियुक्तीपत्र घेण्यासाठी मोठ्या उत्साहाने आलेल्या तृतीयपंथीयांचा हिरमोड झाला.
नोकरी, रोजगार, व्यवसायापासून ते विविध प्रकारची कामे करताना तृतीयपंथीयांना अनेकदा समाजाकडून होणाऱ्या अवहेलनेला सामोरे जावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी, तृतीयपंथीयांबद्दल समाजात सकारात्मक संदेश देण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध विभागांमध्ये तृतीयपंथीयांना नोकरी देण्याचे निश्‍चित केले होते. विशेषतः महापालिकेच्या सुरक्षा विभागामध्ये २५ तृतीयपंथीयांची सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रारंभी दहा तृतीयपंथीयांना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते सोमवारी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार होते. त्यासाठी सोमवारी सकाळी दहा वाजता सुरक्षारक्षकाचा गणवेश परिधान करून दहा तृतीयपंथीयांना महापालिकेत बोलाविण्यात आले होते. नियुक्तीपत्र मिळणार असल्याने तृतीयपंथीही मोठ्या उत्साहाने महापालिकेत आले होते. परंतु, आयुक्त विक्रम कुमार हे बैठकीसाठी मुंबई येथे गेले. त्यामुळे संबंधित तृतीयपंथीयांचा चांगलाच हिरमोड झाला.
सुरक्षारक्षक म्हणून नोकरीवर घेतलेल्या तृतीयपंथीयांपैकी काही जण एक जुलै रोजीच पालिकेच्या सेवेत रुजू झाले आहेत. मात्र, त्यांनाही अद्याप नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही.

महापालिकेमध्ये सुरक्षारक्षक म्हणून सेवेत घेतलेल्या तृतीयपंथीयांना महापालिका आयुक्तांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार होते. मात्र, आयुक्त विक्रम कुमार हे अचानक मुंबईला गेले. त्यामुळे नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम झाला नाही. परंतु, संबंधित तृतीयपंथीयांनी मागील ४ ते ५ दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षारक्षक म्हणून सेवा बजावण्यास सुरुवात केली आहे.
-माधव जगताप, उपायुक्‍त, अतिक्रमण विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.