पीएमपी अध्यक्षच धावले बसमागे

पीएमपी अध्यक्षच धावले बसमागे

Published on

पुणे, ता. १० ः वेळ सकाळी साडेदहाची, काळ्या रंगाचे टी शर्ट घातलेली एक व्यक्ती विश्रांतवाडीच्या बसथांब्यावर बसची वाट पाहत उभी असते. रविवार असल्याने तशी प्रवाशांची गर्दी कमीच. आळंदीहून स्वारगेटला जाणारी बस येताच, ती व्यक्ती पुढे येऊन बसमध्ये चढण्यास सरसावते. मात्र हजारो प्रवाशांच्या वाट्याला येणारा अनुभव त्यांच्या वाट्याला येतो. थांब्यावर गर्दी असतानादेखील चालकाने थांब्याकडे दुर्लक्ष करून बस पुढे दामटली. बस थांबत नसल्याचे पाहून ती व्यक्ती बसच्या मागे धावते; मात्र बस सुसाट निघते. त्या व्यक्तीपासून अनभिज्ञ असलेल्या ‘त्या’ बसचालकाला व वाहकाला पुढच्या काही मिनिटांतच संदेश मिळतो. बसच्या मागे धावणारी व्यक्ती ही दुसरी कोणी नसून, ‘पीएमपी’चे नवे अध्यक्ष सुचिंद्र प्रताप सिंह हे होते. ही माहिती काही मिनिटांतच ‘पीएमपी’च्या वर्तुळात पोचते अन् साऱ्याच चालकांचे धाबे दणाणतात.
‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सिंह यांनी रविवारी पहिल्यांदाच बससेवेचा अनुभव घेण्यासाठी दोन वेगवेगळ्या बसने प्रवास केला. एका प्रवासात त्यांना बसमध्ये गर्दी नसताना, बसथांब्यावर प्रवासी असतानादेखील बस थांबली नसल्याचा वाईट अनुभव आला, तर दुसरीकडे शिवाजीनगरहून विश्रांतवाडीला जाणाऱ्या बसमध्ये वाहक प्रवाशांशी सौजन्याने वागताना व बोलताना आढळून आले. या अनुभवावरून ते काहीसे सुखावले. मात्र या प्रसंगामुळे पीएमपीच्या चालक व वाहकांत आलेली मरगळ काही अंशी तरी दूर झाली आहे.

सर्वच विभागप्रमुख ‘पीएमपी’ने प्रवास करतील
‘पीएमपी’मध्ये आवश्यक तो बदल करण्यासाठी व सेवा अधिकाधिक प्रवासीभिमुख करण्यासाठी सिंह यांनी, महिन्यातून एका शनिवारी सर्व अधिकारी, विभागप्रमुख, पर्यवेक्षकांना वेगवेगळ्या मार्गावर बसमधून प्रवास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रवासाचा अनुभव घेताना सेवा सुधारण्यासाठी काय करता येईल, याचादेखील विचार केला जाणार आहे. त्याचा अहवाल त्यांना सादर करावा लागणार आहे.

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा माझा पहिलाच प्रवास होता. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या उत्पन्नावर दिसून आला. प्रसिद्ध व्यक्तीनेदेखील महिन्यातून एकदा तरी ‘पीएमपी’ने प्रवास करावा, असे मी आवाहन करतो. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल.
सुचिंद्र प्रताप सिंह,अध्यक्ष, पीएमपीएमएल, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.