तंत्रज्ञानामुळे संकरीत गाईच्या पोटी थारपारकर जातीच्या कालवडीचा जन्म

तंत्रज्ञानामुळे संकरीत गाईच्या पोटी थारपारकर जातीच्या कालवडीचा जन्म

टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानातून
‘थारपारकर’ कालवडीचा जन्म

देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राचे यश ः चारही कृषी विद्यापीठांतील पहिलाच प्रयोग यशस्वी

गजेंद्र बडे ः सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १८ ः पुणे येथील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रात टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाच्या (भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान) माध्यमातून संकरित गाईच्या पोटी राजस्थानातील थारपारकर जातीची कालवड जन्माला घालण्यात संशोधकांना यश आले. पुणे शहरातील तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील ही अशी पहिलीच घटना आहे. थारपारकर ही उत्तर राजस्थानातील सर्वाधिक दूध देणाऱ्या गाईची जात आहे.
प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सोमनाथ माने यांनी मंगळवारी ही माहिती दिली. डॉ. धीरज कणखरे प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख आहेत. केंद्रातील प्रयोगशाळेमध्ये थारपारकर जातीची १३३ क्रमाकांची गाय ही ‘दाता गाय‘ म्हणून वापरण्यात आली. या गाईची दूध उत्पादन क्षमता प्रति वेत ३ हजार २९३ किलो इतकी आहे. तसेच दाता वळू म्हणून थारपारकर जातीचा ‘फेथफुल'' नावाच्या वळूचा वापर कऱण्यात आला. या वळूच्या आईचे दूध उत्पादन प्रति वेत तीन हजार पाच किलो इतके आहे. या दुधातील स्निग्धांश ४.८ टक्के आहे. हा भ्रूण पहिल्यांदा प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आणि त्यानंतर सात दिवसानंतर देशी गाई संशोधन प्रशिक्षण केंद्रात असलेल्या पीटी ८० ) या संकरित गाईमध्ये तो प्रत्यारोपण केला. हे प्रत्यारोपण २२ आक्टोबर २०२२ रोजी करण्यात आले. ही गाय १७ जुलै २०२३ रोजी व्याली आहे. वासराचे जन्मतः वजन २१ किलो आहे.

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान म्हणजे काय?

देशातील उत्कृष्ट आनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगला आनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन केले जाते. या फलनातून तयार झालेल्या फलितांडाची (पोटेन्शियल झायगोट) सात दिवस वाढ केली जाते आणि त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता किंवा कमी उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता (Recepient) गाईमध्ये प्रस्थापित करून त्याची वाढ केली जाते. या भ्रूणाची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्यापासून उच्च दर्जाचे वासरू जन्माला येते.
---
राज्य सरकारने हा प्रकल्प देशी गाईंचे जलद गतीने संवर्धन करण्यासाठी आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या यशस्वी वापरासाठी कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पामुळे गावठी किंवा संकरित गाईंच्या माध्यमातून उच्च वंशावळीच्या देशी गाईंच्या कालवडी तयार करून बदलत्या हवामानामध्ये तग धरणाऱ्या व रोग प्रतिकारक क्षमता जास्त असणाऱ्या देशी गाईंची संख्या वाढविण्यास मदत होणार आहे. यामुळे राज्यात दूध उत्पादन वाढीस आणि नैसर्गिक शेतीस मदत होणार आहे.

- डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com