महिनाअखेरीस शनीची प्रतियुती व सुपरमुन

महिनाअखेरीस शनीची प्रतियुती व सुपरमुन

- डॉ. प्रकाश तुपे
ऑगस्ट महिन्यात शनी पृथ्वीजवळ येत असल्याने तो काहीसा तेजस्वी व मोठा दिसेल. शनी सर्वसाधारणपणे वर्षभरात एकदा पृथ्वीजवळ येतो, त्यावेळी शनी व सूर्य यांच्यामधून पृथ्वी प्रवास करते. या स्थितीस प्रतियुती म्हणतात. या दिवशी शनी सूर्यास्तास पूर्वेस उगवतो व रात्रभर आकाशाची फेरी मारून सूर्योदयी पश्चिमेस मावळतो. शनीची प्रतियुती या महिन्यात २७ तारखेला होत आहे.
शनीचे पिवळसर बिंब कुंभ राशीत दिसत असून ते दक्षिणेकडील आकाशात दिसेल. शनी पृथ्वीपासून सुमारे १३३ कोटी किमी अंतरावर येत असल्याने त्याचे बिंब मोठे म्हणजे १९ विकलांचे दिसेल. शनी भोवतालची कडी ४४.२ विकलांएवढी दिसेल व ती ८.१ अंशाने कललेली असेल. शनीची तेजस्विता ०.४ असून प्रतियुतीच्या काही काळ अगोदर शनीची कडी नेहमीपेक्षा जास्त तेजस्वी झाल्याचे दिसते. या वेळी शनीचा उत्तरेचा अक्ष आपल्याकडे झुकलेला असल्याने शनीचा उत्तर गोलार्ध स्पष्ट दिसेल.

ग्रह ः
बुध : पश्चिम क्षितीजावर सूर्यास्तानंतर बुध दिसेल. तो सूर्यापासून दूर होत १० ऑगस्ट रोजी २७ अंशावर पोहचेल. या दिवशी त्याची तेजस्विता ०.३ असेल व तो रात्री साडेआठच्या सुमारास मावळेल. यानंतर बुध सूर्याकडे सरकू लागेल व महिना अखेरीस संधीप्रकाशातच दिसेनासा होईल. या महिन्यात पश्चिम क्षितीजालगत, बुधाच्या वरच्या बाजूस नारिंगी रंगाचा मंगळ दिसत असून या दोघांची छानशी युती बॉयनॉक्युलरमधून पहावी.

शुक्र : पश्चिम क्षितीजावर शुक्र असून तो सूर्यास्तानंतर थोडा वेळ दिसू शकेल. शुक्र सूर्याकडे सरकत असून त्याची सूर्याबरोबर १३ आॅगस्टला युती होईल. युतीनंतर शुक्र पूर्व क्षितीजावर दाखल होत आहे. तो झपाट्याने सूर्यापासून दूर होत महिना अखेरीस सूर्योदयापूर्वी जवळजवळ दीड-दोन तास पूर्व क्षितीजावर दिसू लागेल. या वेळी तो कर्क राशीच्या मंद ताऱ्यामध्ये उणे ४.३ तेजस्वितेने चमकताना दिसेल. दुर्बिणीतून त्याचे ५० विकलांचे बिंब अवघे ११ टक्के प्रकाशित दिसेल.

मंगळ : पश्चिम क्षितीजावर नारिंगी रंगाचा मंगळ दिसत असून तो महिन्याच्या प्रारंभी रात्री नऊच्या सुमारास मावळताना दिसेल व महिनाभरात लवकर मावळत जात महिनाअखेरीस आठच्या सुमारास मावळेल. या महिन्यात मंगळास बुधाची सोबत मिळेल व त्यामुळे महिन्याच्या पूर्वार्धात हे दोन ग्रह एकमेकांलगत दिसत राहतील. या दोघांना साथ देण्यासाठी चंद्रकोर या परिसरात १८ ऑगस्ट रोजी येत असून या वेळी मंगळ, चंद्रकोरीचा छानसा त्रिकोण दिसेल. मंगळाचे बिंब २९ विकलांचे व १.८ तेजस्वितेचे दिसेल.

गुरू : मध्यरात्री तेजस्वी गुरू पूर्व क्षितीजावर मेष राशीत असताना उगवताना दिसेल. रात्री सव्वाबाराच्या सुमारास उगवणारा गुरू महिनाभरात लवकर उगवत जात महिना अखेरीस साडेदहाच्या सुमारास उगवेल. गुरूचे बिंब ४१ विकलांचे दिसेल व त्याची तेजस्विता उणे २.४ असेल. चंद्राजवळ व त्याच्या खालच्या बाजूस गुरू ८ ऑगस्ट रोजी दिसेल.

शनी : पिवळसर रंगाचा शनी या महिन्याच्या प्रारंभी रात्री पावणेनऊच्या सुमारास कुंभ राशीत असताना उगवताना दिसेल. महिन्याभरात तो लवकर उगवत जात महिना अखेरीस तब्बल दोन तास अगोदर म्हणजेच ६ वाजून ३८ मिनिटांनी उगवेल. शनी सूर्यास्तास पूर्वेस उगवून रात्रभर आकाशाची फेरी मारून सूर्योदयी पश्चिमेस मावळेल. या स्थितीस कारण आहे त्याची सूर्याबरोबरची प्रतियुती. प्रतियुतीमुळे शनीचे बिंब मोठे व तेजस्वी दिसेल. चंद्राजवळ शनी ३ व ३० ऑगस्ट रोजी असेल.

युरेनस-नेपच्यून ः युरेनस मेष राशीत दिसत असून तो गुरूच्या जवळ व उत्तर पूर्वेस दिसेल. त्याला पाहण्यासाठी दक्षिण पूर्वेस असलेल्या मेष राशीतील झीटा व डेल्टा ताऱ्यांची मदत होईल. युरेनस या ताऱ्यांच्या जवळच दिसेल. युरेनसची तेजस्विता ५.७ असेल. नेपच्यून मीन राशीतील २० व २४ क्रमांकाच्या ताऱ्यांच्या परिसरात दिसेल. तो दक्षिण पश्चिमेस असलेल्या मीन राशीच्या २० क्रमांकाच्या रोखाने सरकत आहे. या निळसर ग्रहाचे बिंब अवघे २.३ विकलांचे दिसत असून त्याची तेजस्विता ७.८ असेल.

उल्कावर्षाव : अतिशय भरवशाचा व प्रेक्षणीय असा ययातीचा
उल्कावर्षाव १० ते १५ ऑगस्टदरम्यान दिसतो. यंदा उल्कांचा जोर १२ व १३ ऑगस्ट रोजी पहाटे असेल. या वेळी अंधाऱ्या ठिकाणाहून ताशी १०० पर्यंत उल्का पडताना दिसतील. या उल्का ‘स्वीफ्ट टटल’ धूमकेतूमुळे दिसतात. उल्का आकाशात सर्वत्र दिसतात. मात्र त्यांचा माग घेतल्यास त्या ययाती तारकासमूहातील इटा ताऱ्याकडून फेकल्या गेल्यासारखे दिसते.

चंद्र : या महिन्यात दोन पौर्णिमा आहेत. पहिली पौर्णिमा एक तारखेला तर दुसरी ३१ तारखेला आहे. या दोन्ही वेळी चंद्र पृथ्वीजवळ असल्याने तो काहीसा मोठा व तेजस्वी दिसेल. या स्थितीस काहीजण ‘सुपरमुन’ म्हणतात. श्रावण अमावस्या १६ तारखेला दुपारी ३.०८ वाजता होईल. चंद्र पृथ्वीपासून दूर (४,०६,६३४ कि.मी.) १६ ऑगस्ट रोजी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com