मिळकतकर भरण्यास उद्यापर्यंत मुदत

मिळकतकर भरण्यास उद्यापर्यंत मुदत

पुणे, ता. ३१ : मिळकतकराच्या सवलतीसाठी सोमवार (ता. ३१) शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून सर्व नागरी सुविधा केंद्रांवर करभरणा करण्यासाठी नागरिकांची रांग लागली होती. पण सकाळी व्यवहार सुरू होताच पुणे महापालिकेच्या संकेतस्थळात बिघाड होऊन व्यवहार ठप्प झाले होते. ज्येष्ठांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अनेक जण कर न भरता निघून गेले. महापालिकेच्या या कारभारावर टीका झाल्याने अखेर ही मुदत बुधवारी (ता. २) रात्री बारापर्यंत वाढविण्यात आली.
पुणे महापालिकेतर्फे नागरिकांना १५ मे ते ३१ जुलै या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये निवासी मिळकतकरावर पाच किंवा दहा टक्के सूट देण्यात आलेली होती. सोमवारी या सवलतीचा शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमध्ये गर्दी केली होती. तसेच अनेक नागरिकांनी स्वतःच्या मोबाईल, संगणकावरून कर भरण्याचे प्रयत्न सुरू केले होते. ऑनलाइन शुल्क भरण्याची यंत्रणा सकाळी साडेदहाच्या सुमारास बंद पडली. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रातील नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. ही यंत्रणा कधी सुरू होईल त्यांनाही माहिती नव्हते. त्यामुळे अनेक नागरिकांनी काढता पाय घेतला. ज्या ठिकाणी रोखीने व धनादेशाद्वारे कर भरणा सुरू होता. तेथेही अत्यंत संथ गतीने काम सुरू होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (मंगळवारी) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्ताने पोलिसांची तयारी सुरू असल्याने शहरात वाहतूक कोंडी होती, त्याचाही फटका नागरिकांना बसला. यासंदर्भात मिळकतकर विभागाकडे सामाजिक संस्था, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर दोन ऑगस्टपर्यंत मध्यरात्री १२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मिळकतधारकांना ३१ जुलैपर्यंत संपूर्ण मिळकतकर भरल्यास त्यावर पाच किंवा १० टक्के सवलत दिली जाते. सोमवारी अखेरचा दिवस असताना तांत्रिक कारणामुळे अनेकांना कर भरता आला नाही. त्यामुळे सवलतीमध्ये कर भरण्याची मुदत दोन ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच लॉटरी योजनेचा कालावधी देखील दोन ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे.
- अजित देशमुख, प्रमुख, मिळकतकर विभाग

मिळकतकर भरण्यासाठी शनिवारी येथील कार्यालयात गेलो होतो, पण महापालिकेचे सर्व्हर ठप्प असल्याने कर भरता आला नाही. सोमवारी शेवटचा दिवस असल्याने याचा आम्हाला भुर्दंड पडू नये यासाठी महापालिकेने योग्य निर्णय घ्यावा.
- सत्येंद्र राठी, नागरिक

विक्रमी १२०० कोटींचा भरणा
पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मिळकतकराच्या पाच किंवा १० टक्के सवलतीमधून १२०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. या योजनेला आणखी दोन दिवसांची मुदतवाढ दिल्याने ही रक्कम १३०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत १२०० कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. गेल्यावर्षी एक एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत ११४० कोटी रुपये जमा झाले होते.

दोन वर्षांतील तुलनात्मक आकडेवारी
१/४/२०२३ ते ३१/७/२०२३
मिळकतधारक - सात लाख २३ हजार
जमा झालेला कर - १२००.१४ कोटी

१/४/२०२३ ते ३१/७/२०२२
मिळकतधारक - सहा लाख ६४ हजार
जमा झालेला कर - ११४०.१२ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com