

देशात कोणतीही चळवळ वैचारिक प्रगल्भतेच्या आधारावर सुरु होते आणि प्रामाणिक प्रयत्नांद्वारे ती जनमानसांत रुजते. कन्नड भाषिकांसाठी अशीच एक चळवळ पुण्यात ६० वर्षांपूर्वी सुरु झाली आणि आज शहराचा एक अविभाज्य भाग बनून पुणेकरांच्या हृदयात सामावूनही गेली. कन्नड संघ हे या चळवळीचे मूर्त स्वरूप. संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाला आजपासून (ता. १९) सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने....
- कुशल हेगडे,
अध्यक्ष, कन्नड संघ
कन्नड संघाच्या वतीने ६० वर्षांपूर्वी डॉ. कलमाडी श्यामराव कन्नड माध्यमिक शाळेची स्थापना झाली. कर्नाटक राज्यातून नोकरी- धंद्याच्या शोधात जे कन्नड भाषिक नागरिक पुण्यात स्थलांतरित झाले, त्यांना एकत्र करीत सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत, या उद्देशाने कन्नड संघ स्थापन झाला. याद्वारे सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असे. त्याकाळी पुणे शहरात कन्नड भाषेत शिक्षण देणाऱ्या माध्यमिक शाळा नसल्याने स्थलांतरित कामगारांच्या मुलांचे शिक्षण थांबत असे. यावर उपाय म्हणून कन्नड भाषेतील पहिली माध्यमिक शाळा सुरु झाली. बुधवार पेठेतील एच. व्ही. देसाई महाविद्यालय, रास्ता पेठ एज्युकेशन संस्था, टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशाला अशा विविध ठिकाणी त्याकाळी सोयीनुसार शाळेचे वर्ग व्हायचे. १९६४-६५ मध्ये संस्थेने एरंडवणेत स्वत:ची जागा घेतली. कन्नड भाषिक असलेली ही राज्यातील एकमेव शाळा आहे. हॉटेल व बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी या शाळेने विकासाची, शिक्षणाची दारे उघडून त्यांच्या स्वप्नांना उडण्याचे बळ दिले आहे.
सध्या शाळेत कन्नड भाषेत सर्व विषय शिकविले जातातच; याबरोबर मल्लखांब, तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जाते. शाळेचा अभ्यासक्रम एसएससी बोर्डाप्रमाणे आहे. इतर विषयांसोबत संगणक, संगीत, शिवणकाम, एम्ब्रॉयडरीचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजनासह मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके आदी गोष्टीही देण्यात येतात. गरजू व हुशार विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शून्य व्याजदराने संस्था कर्जही देते. विद्यार्थिनींसाठी लीला पूनावाला शिष्यवृत्तीसारख्या योजना राबविल्या जातात.
शाळेच्या इमारत उभारणीच्या काळात स्वत: डॉ कलमाडी श्यामराव हे आपल्या अॅम्बॅसिडरमधून विटा आणून टाकायचे, इतकेच नव्हे तर सुरुवातीला इमारतींना पाणी देण्याचे कामही त्यांनी केले. शाळेची इमारत उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत निधी जमविला. यामध्ये अनेकदा पं. भीमसेन जोशी यांनी त्यांना मोलाची साथ केली. संस्थेचा वटवृक्ष बहरत चालला असून कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत आज संस्था यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. आज नऊ हजारांहून अधिक विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.