मुलांनी खेळायचे कुठे?
पुणे, ता. १८ ः महापालिकेच्या क्रीडांगणांचे भयानक वास्तव मांडणारी ‘मैदानांचा खेळखंडोबा’ ही मालिका ‘सकाळ’ने १० दिवस प्रसिद्ध केली. महापालिकेने केवळ निधीचा देखावा केला असून प्रत्यक्षात मात्र मैदानांचा बट्ट्याबोळ झाल्याची स्थिती आहे. शहरातील खेळाडूंना किती अडचणींना सामोरे जावे लागते, याचे भीषण चित्र यातून समोर आले आहे. त्यांच्यासह शहरातील मुलांनी खेळायचे कुठे, असा प्रश्न पालकांसमोर आहे.
गेल्या आठ वर्षांत नऊ क्रीडांगणांसाठी महापालिकेने तब्बल ३४ कोटी ५४ लाख रुपयांची तरतूद केली होती. प्रत्यक्षात या मैदानांची स्थिती पाहिल्यानंतर यातील एक रुपया तरी मैदानांवर खर्च झाला असेल का?, यावर शंका यावी अशी स्थिती आहे. करदात्यांच्या पैशांतून केलेली ही उधळपट्टीच म्हणावी लागेल.
पुण्यातील वाडा संस्कृती जाऊन सोसायट्यांची संस्कृती रुजली. वाड्याच्या आसपास असणारी मोकळी जागा आणि तेथे खेळणारी मुले, हे दृश्यही दिसेनासे होत गेले. आज सोसायट्यांच्या आसपासच काय तर त्यांच्या पार्किंगमध्येही फारशी मोकळी जागा नसते. त्यातच मोबाईल आणि यंत्राच्या माऱ्यामुळे करियर म्हणून नाही, पण किमान व्यायाम म्हणून मुलांनी मैदानांवर खेळायला जाणे, ही मूलभूत गरज झाली आहे. ती पूर्ण करणे, हे महापालिकेचे कर्तव्य आहे. परंतु, त्यांच्याच मैदानांची अशी भयानक परिस्थिती असल्याने मुलांना खेळायला पाठवायचे कुठे, असा प्रश्न पालकांपुढे निर्माण होत आहे.
प्रत्येक पावलावर संघर्ष
खेळाडूंसाठी मैदाने महत्त्वाची आहेतच. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू घडवलेले हे शहर आहे. आजही येथील अनेक खेळाडू विविध खेळांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, त्यांना सरावासाठी पुरेशा पायाभूत सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. एकीकडे ऑलिंपिक खेळाडू घडविण्याच्या योजना आखल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र खेळाडूंना प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागतो आहे.
दुरुस्त्या तातडीने पूर्ण करा !
मैदाने आणि क्रीडासंकुलांसाठी तरतूद केलेल्या निधीचे उत्तरदायित्व महापालिकेलाच घ्यावे लागेल. निधी प्रत्यक्षात वापरला जात नसेल, तर त्याची जबाबदारी महापालिकेला पार पाडावीच लागेल. मैदानांची आणि क्रीडासंकुलांच्या स्थितीचा आढावा घेऊन तेथील दुरुस्त्या तातडीने पूर्ण कराव्या लागतील.
महापालिकेने काय करायला हवे?
- तरतूद केलेला निधी आणि त्याच्या विनियोगावर लक्ष ठेवणे
- निधी देऊनही कामे होत नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे
- सर्व मैदाने आणि क्रीडासंकुलांच्या देखभालीसाठी पूर्णवेळ माणसाची नियुक्ती करणे
- मैदाने आणि क्रीडासंकुले बांधताना जाणकारांचा सल्ला घेणे
- गरज भासल्यास खेळाडू आणि प्रशिक्षकांची समिती नियुक्त करणे
तुम्हाला काय वाटते?
शहरातील महापालिकेच्या मैदानांची दुरवस्था लाजिरवाणी तर आहेच, मात्र त्यासाठी करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग केला जात आहे. शहराचा विकास करत असताना मुलांच्या आरोग्यासाठी आणि खेळाडूंच्या भवितव्यासाठी या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले. याविषयी तुमचे मत कळवा....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

