सोमवारपासून ‘शब्द-स्वर-उत्सव’चे आयोजन

सोमवारपासून ‘शब्द-स्वर-उत्सव’चे आयोजन

Published on

सोमवारपासून ‘शब्द-स्वर-उत्सव’चे आयोजन
पुणे ः ज्येष्ठ गायक-अभिनेते चंद्रकांत काळे यांच्या ‘शब्दवेध’ संस्थेला यंदा ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने संस्थेने सोमवारपासून (ता. २१) ‘शब्द-स्वर-उत्सव’ हा तीन दिवसीय महोत्सव आयोजित केला आहे. विविध भाषिक कवींच्या राजकीय आणि सामाजिक कवितांवर आधारित ‘आज या देशामध्ये’ या कार्यक्रमाने महोत्सव सुरु होईल. मंगळवारी (ता. २२) ‘अपरिचित पुलं’, बुधवारी (ता. २३) ‘बिंदूनादकलातीत’ हे कार्यक्रम होतील. दररोज सायंकाळी सात वाजता टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात कार्यक्रम होतील. काळे यांच्यासह ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर, अभिनेता गिरीश कुलकर्णी, अभिनेत्री विभावरी देशपांडे, युवा रंगकर्मी हर्षद राजपाठक आदी कलाकार यात सहभागी होतील. कार्यक्रम विनामूल्य असले तरी प्रवेशिका आवश्यक आहेत.
----
अवयवदानाबाबत लघुपटाचे प्रदर्शन
पुणे ः अवयवदानाबद्दल जनजागृतीच्या उद्देशाने निर्मिती झालेल्या ‘दुविधा’ लघुपटाचे प्रदर्शन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात झाले. राहुलस् ग्राफिक्स संस्थेतर्फे निर्मित लघुपटाचे दिग्दर्शन राहुल पणशीकर यांचे आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी लघुपटात भूमिका साकारली आहे. यात अवयवतस्करीबाबतही भाष्य करण्यात आले आहे. याप्रसंगी फ्लिटगार्ड फिल्ट्रमचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर, विपणन व ब्रँडिंग प्रमुख पीयूष श्रीवास्तव यांच्यासह लघुपटात काम केलेले कलाकार गिरीश परदेशी, अपर्णा मेनन, शीतल राऊत, राध्येय कापरे, सुजित देशपांडे, निखिल जोशी आदी उपस्थित होते.
----
‘दरवळ : मराठी साहित्य संस्थांचा’ प्रकाशित
पुणे ः मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या ५० संस्थांची आणि विविध ठिकाणच्या १०० मराठी साहित्य संमेलनांची माहिती असलेल्या सचिन तळे लिखित ‘दरवळ : मराठी साहित्य संस्थांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चित्रा वाघ, नीलम गोऱ्हे, लेखक सचिन तळे, त्यांच्या पत्नी दीप्ती आणि वल्लरी प्रकाशनाचे वेंकटेश कल्याणकर उपस्थित होते.
---
‘रंगबहार’ प्रदर्शन मंगळवारपासून
पुणे ः डॉ. दत्तात्रय फडके यांच्या फॅब्रिक कोलाजचे ‘रंगबहार’ हे प्रदर्शन मंगळवारपासून (ता. २२) आयोजित करण्यात आले आहे. २७ ऑगस्टपर्यंत गोखलेनगर येथील दर्पण कलादालन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य खुले असेल. डॉ. फडके यांनी या कलाकृती रंग न वापरता विविध कागदांचे तुकडे वापरून तयार केल्या आहेत.
----
रविवारी-सोमवारी ज्योतिष अधिवेशन
पुणे ः भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अकादमी, सातारा यांच्यातर्फे रविवारी (ता. २०) आणि सोमवारी (ता. २१) ४१ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष उल्हास पाटकर आणि प्रसिद्धीप्रमुख डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी ही माहिती दिली. या दोन संस्थांसह राज्यभरातील २७ ज्योतिष संस्था आणि देशभरातील सुमारे १०० ज्योतिर्विद यात सहभागी होतील. उद्यान प्रसाद सभागृह येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत अधिवेशन होईल.
----
संपूर्ण गीतरामायणाचे बुधवारी सादरीकरण
पुणे ः ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीत रामायणातील संपूर्ण ५६ गीतांचे कथानकासह सादरीकरण येत्या बुधवारी (ता. २३) आयोजित कार्यक्रमात होणार आहे. कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी नऊ वाजल्यापासून कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रस्तुती ‘महक कॉन्सर्टस्‌‍ ॲण्ड इव्हेंटस्‌’‍च्या संचालिका मनिषा निश्चल यांची आहे. गदिमा यांचे पुत्र आनंद माडगूळकर मध्यवर्ती भूमिकेत असून ते निरूपणासह काही गीते सादर करतील. श्रेया माडगूळकर-सरपोतदार, मनिषा निश्चल, प्रमोद रानडे आदी कलाकारही यात सहभागी होतील.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com