गौरी किर्लोस्कर, विलास शिंदे यांचा गौरव

गौरी किर्लोस्कर, विलास शिंदे यांचा गौरव

पुणे, ता. २१ : उद्योग विभागाच्या वतीने ‘उद्योगिनी पुरस्कार’ गौरी किर्लोस्कर यांना, तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार’ ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना प्रदान करण्यात आला.
रविवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ‘उद्योगरत्न पुरस्कार’ रतन टाटा यांच्यावतीने टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी स्वीकारला, तर ‘उद्योगमित्र पुरस्कार’ ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांना देण्यात आला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक आणि उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यावेळी उपस्थिती होते.

गौरी किर्लोस्कर
गौरी किर्लोस्कर या ‘किर्लोस्कर लिमिटलेस’मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. २०१४ पासून त्या ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन’ कंपनीतील संचालक मंडळाच्या सदस्य आहेत. तसेच त्या ‘बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘द बॉम्बे डाइंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड’मध्ये संचालक आहेत. या कंपन्यांमध्ये त्या एचआर, ब्रँडिंग आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभागाचे प्रतिनिधित्व करतात. ‘किर्लोस्कर वसुंधरा’च्या मार्फत त्या ग्रुपच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीचे (सीएसआर) नेतृत्व त्यांच्याकडे आहे. गौरी यांनी यूएसर्इधून बी.एस्सी.ची पदवी मिळवली आहे.

विलास शिंदे
शिंदे हे सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. एकत्र येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून जागतिक दर्जाची संस्था म्हणून सह्याद्री फार्म्स नावारूपास आली आहे. ‘सह्याद्री’ ही द्राक्ष निर्यात करणारी व विविध फळांवर प्रक्रिया करणारी कंपनी आहे. नाशिक जिल्ह्यात मोहाडी (ता. दिंडोरी) येथे सुमारे १२० एकर क्षेत्रांवर ‘सह्याद्री फार्म्स’ने अत्याधुनिक एकात्मिक प्रकल्प उभारला आहे. त्यामधील सुविधा आणि यंत्रणा यांच्या आधारे ताजा शेतीमाल आणि प्रक्रियायुक्त शेती उत्पादने यांची ४२ देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यातून सुमारे सहा हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यात ‘सह्याद्री’ यशस्वी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com