बंगिनवार यांच्या कार्यपद्धतीबद्दल
चौकशी अहवालास विलंब

बंगिनवार यांच्या कार्यपद्धतीबद्दल चौकशी अहवालास विलंब

पुणे, ता. २१ ः पुणे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार यांना लाचप्रकरणात पकडल्यानंतर त्यांच्या संदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने समिती गठित केली होती. पण, या समितीची मुदत उलटून गेली असली तरीही अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही.

पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बंगिनवार यांना यंदाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडून १० लाख रुपयांची लाच घेताना, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने महाविद्यालयाच्या कामकाजावर अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. राजकीय पक्ष, संघटनांनी आंदोलन करत, या ट्रस्‍टवरील अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, महापालिकेने या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा आणि महापालिकेचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.

दरम्यान, या महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, इतर कर्मचारी यांच्या महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल, अधिष्ठाता डॉ. बंगिनवार यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी होत्या. त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी उपायुक्त महेश पाटील, आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांची चौकशी समिती १४ आॅगस्ट रोजी स्थापन केली. या समितीने १८ आॅगस्टपर्यंत त्याचा अहवाल देणे अपेक्षीत होते. त्यानंतर ही समिती सोमवारी (ता. २१) अहवाल देईल, असे सांगण्यात आले होते. पण, अद्याप चौकशी अहवाल आलेला नाही.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, ‘‘वैद्यकीय महाविद्यालयाच्या तक्रारी संदर्भात चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com