‘गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोपीचंद पडळकर यांच्यावर
गुन्हा दाखल करावा’
‘गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा’

‘गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा’

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशाचे तुकडे करण्याची भाषा करून देशद्रोह केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या संदर्भात पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवार यांच्याविरोधात पडळकर हे काही महिन्यांपासून गरळ ओकत आहे. तसेच, त्यांनी देशाचे तुकडे करण्याची भाषा केल्याबाबत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी, याबाबत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. ‘लवासा, बारामती आणि मगरपट्टा हे तीन राज्य करण्यात यावेत. या तिन्ही राज्यांचा मिळून एक वेगळा देश निर्माण करून शरद पवार यांना पंतप्रधान करावे’, असे वादग्रस्त वक्तव्य पडळकर यांनी केले होते. त्यांचे हे वक्तव्य भारताच्या संघराज्य व्यवस्थेला छेद देणारे आहे. याबाबत पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच, इंदापूर येथील जाहीर सभेत पडळकर यांनी पवार आडनाव असलेल्या अठरापगड जाती -धर्मातील कुटुंबीयांचा आणि त्यांच्या जातीचा अवमान केला आहे. यापैकी आदिवासी व मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही वादग्रस्त वक्तव्याबद्दल पडळकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिस आयुक्त याबाबत गांभीर्याने विचार करून कार्यवाही करतील, अशी अपेक्षा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
या शिष्टमंडळात प्रवक्ते प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, महेश पवार, माधव पवार, मधुकर पवार, महेश हंडे, शशिकांत जगताप, दीपक कामठे, शुभम मताळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.