
शाळेत जाण्यासाठी शिक्षकांची ‘परीक्षा’!
पुणे, ता. २९ ः आमचं आता वय झाले आहे. वयाची ५३ वर्षे पूर्ण करणाऱ्या शिक्षकांची बदली केली जात नाही. परंतु आमच्यापैकी कुणी ५३व्या वर्षात पदार्पण केले तर, कुणी ५३ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र बदल्यांना विलंब झाल्याने, आमचे मागच्या वर्षीचेच वय ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यामुळे आम्हाला नियमानुसार बदल्यांमध्ये मिळणारी सूट नाकारली गेली आहे. आता या वयात आम्हा शिक्षक-शिक्षिकांपैकी अनेकांना मधुमेह, रक्तदाब, मणक्यांचे आजार, गुडेघेदुःखी अशा आजारांनी गाठले आहे. अशा वयात स्वतःच्या तालुक्यातील शाळा मिळावी, ही आम्हा सर्वांची माफक अपेक्षा असते. परंतु या वयात आमची आता अतिदुर्गम भागातील शाळांवर बदली केली आहे. अशी व्यथा आहे वयाची पन्नाशी ओलांडलेल्या जिल्ह्यातील पावणेतीनशे शिक्षकांची...
बोटीतून एक तास प्रवास
माझी बदली मुळशी तालुक्यातील भोरदेव शाळेवर झाली आहे. या शाळेचे अंतर माझ्या गावापासून पावणेदोनशे किलोमीटर आहे. शिवाय या शाळेवर पोचण्यासाठी पहिल्यांदा बोटीतून एक तास प्रवास करावा लागतो. त्यानंतर निर्जन आणि अतिदुर्गम डोंगर-दऱ्यांमधून दोन तास पायपीट करावी लागते. शाळेवर मनुष्यवस्तीही कमी. त्यामुळे शाळेच्या आसपास निवासाची सोयही करता येत नाही. अशा या निर्जन भागातील शाळेवर मी पोचू शकत नसल्याचे दौंड तालुक्यातील भागवतवाडी शाळेवर असलेल्या उपशिक्षिका खुदेजा तैमूर शेख सांगत होत्या.
राहण्याची सोय नाही
बारामती तालुक्यातून मुळशी तालुक्यात बदली झालेल्या एका शिक्षिकेने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, बदल्यांच्या सहाव्या फेरीत मला मुळशी तालुक्यातील अतिदुर्गम शाळा मिळाली आहे. सध्याच्या शाळेपासून नव्या शाळेचे अंतर हे १५५ किलोमीटर आहे. नव्या शाळेवर जाण्यासाठी दळणवळणांची सुविधा नाही. शाळेजवळ राहण्याची सोय नाही. त्यामुळे आम्हा शिक्षिकांवर या बदल्यांनी मोठा अन्याय केला आहे.’’
जिल्ह्यातील २७४ कुटुंबे विस्कळित
- शिक्षकांच्या बदल्यांच्या सहाव्या फेरीत २७४ शिक्षकांच्या बदल्या या अतिदुर्गम भागातील शाळांवर झाल्या आहेत.
- यापैकी १७४ उपशिक्षक आणि १०० पदवीधर शिक्षक आहेत.
- वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून वगळण्यात येत असले तरी या २७४ पैकी ५५ शिक्षक हे वयाची ५३ वर्ष पूर्ण केलेली आहेत.
- वयाच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी ३० जून २०२२ अशी डेडलाईन ग्राह्य धरण्यात आल्याने ही नवी समस्या पुढे आली आहे.
- याशिवाय अतिदुर्गम भागात बदली झालेल्यांमध्ये १५३ शिक्षिकांचा समावेश आहे.
- परिणामी या बदल्यांमुळे जिल्ह्यातील २७४ शिक्षकांची कुटुंबे विस्कळित झाल्याचे जयश्री कुंजीर, मनीषा मटाले, कल्पना कुंजीर, मनीषा मारणे, आशा कुंजीर, योजना मंगुडकर, पल्लवी पवार यंनी सांगितले.
दोनशे शिक्षकांची न्यायालयात धाव
सध्याचे आमचे वय म्हणजे आमच्या सेवेचा अंतिम टप्पा आहे. अशा सेवेच्या अंतिम टप्प्यात आम्हाला कुटुंबापासून दूर राहण्यासाठी बदल्यांचे नवे धोरण कारणीभूत ठरू लागले आहे. वयोमानामुळे अनेकांना विविध शारीरिक आजारांनी ग्रासले आहे. आईवडिलांची सेवा, कौटुंबिक जबाबदाऱ्या या आणि अशा विविध बाबींचा विचार करून आम्हा सर्वांना स्वतःच्या तालुक्यातील शाळेवर नियुक्ती मिळणे गरजेचे आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अनोळखी, अतिदुर्गम ठिकाणी नेमणूक देताना महिलांना प्राधान्याने वगळणे आवश्यक आहे. त्यामुळे गंभीर आजार आणि पन्नाशी ओलांडलेल्या सर्व शिक्षकांच्या या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी शिक्षकनेते रोहिदास मेमाणे, सुधीर मेमाणे, बाळकृष्ण रणदिवे आदींसह सर्व शिक्षिकांनी केली आहे. या मागणीसाठी २०० शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
याआधी २०१६ मध्ये मी वेल्हे तालुक्यातील मार्गासनी येथे दोन वर्षे
काम केले आहे. ही शाळा पूर्वी अवघड क्षेत्रातील होती. मात्र अतिदुर्गम भागात असलेली ही शाळा मध्येच ती सुगम झाली आणि या शाळेच्या शेजारी अगदी रस्त्यालगत असलेली सुगम शाळा दुर्गम झाली. यामुळे माझी बदली झाली आणि या शाळेवरील नियुक्ती ही सुगम शाळेवरील ग्राह्य धरल्याने, यंदा परत माझी बदली वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भागात झाली आहे.
- दत्ता भोसले, अध्यक्ष, बारामती तालुका एकल शिक्षक संघटना