
पुणे, ता. २० : नगर रस्त्यावरील ‘बीआरटी’ ही सामान्य नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. या बीआरटीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे येथील बीआरटी अयशस्वी ठरली आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनाने नगर रस्त्यावरील बीआरटी त्वरित काढून टाकावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या कनिज सुखरानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सुखरानी यांनी बीआरटी काढण्याचे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविले आहे. शहरातील बीआरटी ही हायब्रीड असून ती ‘बीआरटीएस’च्या जागतिक मानकांशी सुसंगत नाही. बीआरटीबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार महापालिकेला आहे, त्यानुसार, त्यांनी निर्णय घ्यावा, अशीही मागणी सुखरानी यांनी पत्राद्वारे केली आहे.