
मित्र, गुरू आणि मार्गदर्शक
प्रत्येकाच्या आयुष्याच्या वळणावर खाचखळगे, काटेकुटे असतात. त्यातूनच वाट काढत भविष्यात फुलांसारखी वाट असेल, असा विचार करून त्या दिशेने पावले टाकणारे पण त्यातही स्वतःची एक व वेगळी ओळख असणारे खूप कमी लोकं असतात. आपल्या आजूबाजूची अत्यंत नकारात्मक परिस्थिती असूनही स्वतःच्या जिवावर स्वर्ग उभा करणाऱ्या अनेक लोकांपैकी एक वेगळे नाव म्हणजे पूना कॉलेजचे प्राचार्य आणि माझे पी. एचडी मार्गदर्शक डॉ. अन्वर शेख सर. सरांच्या आज ६० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी...
- डॉ. नितीन घोरपडे,
व्यवस्थापन परिषद सदस्य,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सरांची आणि माझी ओळख राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करताना झाली. राष्ट्रीय सेवा योजनेचा खराखुरा अर्थ समजून घेउन तो विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी, ते त्यांच्यात बिंबविण्यासाठी झटणारा प्राध्यापक मी त्यांच्यात पाहिला. चर्चा सत्र, परिषदांनाही आम्ही एकत्र आल्याने आमचे विचार जुळले आणि ते मला पी.एचडीसाठी मार्गदर्शक म्हणून लाभले.
सर माझे पी.एच.डीचे मार्गदर्शक होते. येत्या काही दिवसांत त्यांचा ३४ वा विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी पदवी प्राप्त करणार आहे. सर्व विषयांना आणि विद्यार्थ्यांना योग्य न्याय देत ३४ विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. सरांची स्वतःची पी.एच.डी खूप लवकर म्हणजे वयाच्या २८ व्या वर्षी झालेली आहे. या काळात प्राध्यापक नसताना सेंट्रल एक्साईज कस्टममध्ये लोअर डिव्हिजनल क्लार्क म्हणून नोकरी करत असताना, असे संशोधनाचा विचार करणे आणि तो पूर्णत्वाला नेणं हे सरचं करू शकतात. पूना काॅलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी कौशल्यविकास उपक्रमांची सुरुवात महाविद्यालयामध्ये केली. महाविद्यालयाला नॅकची ए पल्स ग्रेड मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
सरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कामाची दखल घेउन त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यामध्ये पुणे विद्यापीठाचा जी. बी. कुलकर्णी पुरस्कार, ‘सकाळ’ माध्यम समूहाचा आयकाॅनिक प्रोफेशनल ऑफ महाराष्ट्र २०२१ पुरस्कार, भारत सरकार युवा मंत्रालयाचा राष्ट्रीय युवा पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी शेख सर सन्मानित झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामामुळे २०१० मध्ये त्यांना पुणे विद्यापीठाचा राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य होण्याची संधी मिळाली.