
वाहनांच्या वेगावर आता येणार नियंत्रण मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर ‘एचटीएमएस’ यंत्रणा बसविण्याचे काम सुरू
पुणे, ता. २९ : मुंबई- पुणे एक्स्प्रेस-वे (द्रुतगती महामार्ग) वरील अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (एचटीएमएस) बसविण्याचे काम सुरू केले असून सप्टेंबर अखेरपर्यंत ते पूर्ण होणार आहे. त्याच बरोबरच वाहनांनासाठी विशेष थांबे उभारण्याची संकल्पना आयआरबी कंपनीकडून मांडली असून त्यास राज्य शासनाकडून मान्यता मिळताच महामार्गावर ते उभारण्याचे नियोजन आहे.
वाढत्या वेगामुळे एक्स्प्रेस-वे वर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने ‘एचटीएमएस प्रणाली’ कार्यान्वित करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक चार किलोमीटर अंतरावर ‘स्पीड डिटेक्शन सिस्टिम, ‘लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’ आदी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या विशेष यंत्रांच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. महामार्गावरील संवेदनशील अशा ९४ किलोमीटर पट्ट्यात ही प्रणाली कार्यान्वित करणार असून सद्यःस्थितीला ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होतील.
या महामार्गावर निसर्गरम्य ठिकाणे आहेत. त्यामुळे प्रवासी रस्त्याच्या कडेला वाहने थांबवितात. तसेच उपाहारगृह किंवा इतर ठिकाणी वाहने थांबत असल्याने वर्दळीच्या या महामार्गावर अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यावर उपाय म्हणून ‘आरआबी कंपनी’ कडून महामार्गालगत ठराविक अंतरांवर वाहन थांबे करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून त्यांच्याकडून सूचना प्राप्त होताच याबाबतची कार्यवाही करणार आहे.
‘‘सद्यःस्थितीला वाहतूक पोलिसांकडून तसेच महामार्गाच्या अधिकारी, कर्मचारी बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करत आहेत. विशेषतः: महामार्गालगत असणारे निसर्गरम्य ठिकाणे, घाट रस्त्यात वाहने थांबविले जात आहेत, अशा वाहनधारकांवर देखील कारवाई केली जात आहे. पायाभूत प्रकल्पांतर्गत आयआरबी कंपनीकडून वाहन थांब्यांबाबत प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून याबाबत मान्यता प्राप्त होताच पुढील कार्यवाही सुरू करणार आहे.
- राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी