
दस्तनोंदणी कार्यालयाची जागा बदलणार
पुणे, ता. ३० : हडपसर येथील (हवेली-तीन) दस्तनोंदणी कार्यालयाची जागा बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. हडपसर मेगा सेंटर येथील दस्तनोंदणी कार्यालय गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे खरेदीखत तसेच भाडेकरार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हे कार्यालय केव्हा सुरू होणार याबबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. यापूर्वीदेखील दोन ते तीन वेळा हे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. आतादेखील पुन्हा कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे म्हणाले, ‘काही कारणांमुळे हे कार्यालय बंद आहे. आता मात्र या कार्यालयाची जागा बदलण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल.’