परदेशी पाहुण्याला आली ‘अतिथि देवो भव’ची प्रचिती

परदेशी पाहुण्याला आली ‘अतिथि देवो भव’ची प्रचिती

पुणे, ता. १ : ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ असा काहीसा नागरिकांचा अनुभव असतो. मात्र, त्याला गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय अपवाद ठरले. पोलंडवरून योगाविषयक अभ्यासासाठी पुण्यात आलेल्या एका परदेशी नागरिकाला मोबाइलचे सिमकार्ड मिळण्यास मोठी अडचण येत होती. स्थानिक कागदपत्रे नसल्यामुळे शहरात फिरूनही त्यांना सिमकार्ड काही मिळाले नाही, आता करायचे काय असा प्रश्‍न त्या पाहुण्याला पडला. एका दुकानदाराच्या सांगण्यावरून त्या नागरिकाने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांनी त्यांची संवाद साधला अन्‌ पुढच्या काही तासांतच त्याला सिमकार्ड मिळाले. ‘अतिथि देवो भव’ची प्रचिती अधिकाऱ्यांच्या निमित्ताने या परदेशी पाहुण्याला अनुभवयास मिळाली.

मध्य पोलंडमधील वूत्श या शहरातील रोमन रोझिन्स्की असे या परदेशी पाहुण्याचे नाव. योगविषयक अभ्यासासाठी पुण्यातील रमामणि अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूट येथे आले आहेत. रोमन यांना दूरध्वनी करण्यासाठी रोमिंग पडत असल्याने त्यांनी पुण्यातून सिमकार्ड खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते शहरात सिम खरेदीसाठी फिरले. मात्र, त्यांच्याकडील पोलंडची कागदपत्रे पाहून सीमकार्ड देण्यास दुकानदारांनी नकार दिला. एका दुकानदाराने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यास काही मदत मिळू शकेल, असा पर्याय सुचविला. त्यानुसार रोमन हे गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

पालखी वारी संदर्भातील बैठक सुरू असतानाही रोमन यांची निकड लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी रोमन यांची भेट घेऊन अडचण समजून घेतली. रोमन यांचे पारपत्र, इतर कागदपत्रे तपासून खात्री केल्यानंतर अय्यंगार इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला. सर्व खातरजमा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचारी रोमन यांच्यासोबत देऊन त्यांना सीमकार्ड मिळवून देण्यात आले. त्यांनतर रोमन यांनीही जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

माझ्या योग शिक्षकांनी मला पुण्यातील अय्यंगार इन्स्टिट्यूटबाबत माहिती दिली. दोन महिन्यांसाठी मी पुण्यात दाखल झालो आहे. रोमिंग पडत असल्याने स्थानिक सीमकार्ड घेण्यासाठी विविध ठिकाणी गेलो. मात्र, नकार मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी अतिशय आपुलकीने चौकशी करून मला मदत केली आणि मला सीमकार्ड मिळाले.
- रोमन रोझिन्स्की, पोलंड

पोलंडमधील एक नागरिक योगविषयक अभ्यासासाठी पुण्यात आला आहे. सिमकार्ड खरेदी करताना येणाऱ्या अडचणींबाबत त्याने माहिती दिली. त्यांची गरज लक्षात घेऊन सर्व कागदपत्रे, पारपत्र याबाबत खात्री केल्यानंतर त्यांना योग्य ती मदत देऊन सीमकार्ड मिळवून देण्यात आले.
- ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com