चित्रकार रवी परांजपे : एक स्मृतिचित्र

चित्रकार रवी परांजपे : एक स्मृतिचित्र

Published on

चित्रकार रवी परांजपे काळाच्या पुढे राहून परंपरेच्या बंधनात न अडकता वेगळ्या दृष्टिकोनातून चित्रकलेचा आलेख मांडू पाहणारे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. सरांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या ६० वर्षांच्या चित्रमय वाटचालीचा आढावा घेणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन २० ते २६ जून दरम्यान मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये करण्यात आले आहे. त्यानिमित्त...

चित्रकार रवी परांजपे : एक स्मृतिचित्र
- दत्ता सावंत, चित्रकार

रवी परांजपे सरांची आणि माझी भेट मी जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्टमध्ये असताना झाली. आमच्या त्या मंतरलेल्या दिवसात रवी परांजपे सर आम्हाला व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून यायचे. सर रेखाचित्र काढताना दोन नंबरचा ब्रश वापरीत असत. त्यांनी ब्रशने काढलेल्या रेषा पेनालाही लाजवतील इतक्या सफाईदार असायच्या. त्यांची ब्रशवरची हुकूमत काही वेगळीच होती. वर्तुळं, लंबवर्तुळाकार ते अगदी लीलया रेखाटत.
तो काळ illustration (बोधचित्र) या विषयाचा जणू सुवर्णकाळच होता. तेव्हा जाहिरातींमध्ये आवर्जून illustration वापरलं जायचं. कुठलाही विषय illustration च्या माध्यमातून साकारला जायचा. त्या कारणाने बऱ्याच नामवंत, कुशल चित्रकाराचं काम जाहिरातींमध्ये वापरलं जायचं. अविनाश गोडबोले, मनोहर जोशी, गोपी कुकडे, प्रभाशंकर कवडी, द. ग. गोडसे, दत्तात्रय पाडेकर, जॉन फर्नांडीस यांच्यासारखे मातब्बर चित्रकार तेव्हा कार्यरत होते. illustration मध्ये सर्वाधिक उंचीवर असलेलं नाव म्हणजे रवी परांजपे सर!
परस्पर विरोधी रंगांनाही गुण्या गोविंदाने नांदायला लावण्याचं काम फक्त रवी परांजपे सरांनीच करावं. डोळ्यांना आणि मनाला सुखावणारी रंगसंगती त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून दिसायची. लघुचित्र (miniature) शैलीला आधुनिक रूप देऊन परांजपे सरांनी त्यांची अशी स्वतःची चित्ररचना निर्माण केली.
फिगरेटीव्ह असो, निसर्ग चित्रण असो, किंवा स्थापत्य (आर्किटेक्चरल ड्रॉइंग) असो सर्वच प्रकारात परांजपे सर पारंगत होते. बेन्सन्समध्ये असताना ओबेरॉय शेरेटन हॉटेलच्या नियोजित इमारतीचं कल्पना चित्र करताना मी त्यांना पाहिलं होतं. बांधून पूर्ण झालेली इमारत वरून जशी दिसेल इतकं ते चित्र परिपूर्ण झालं होतं. सध्या आर्किटेक्चरल ड्रॉइंगसाठी बरीच सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. पण त्या काळात महाकठीण काम होतं ते! तसंच इंडिया बुक हाउसने प्रकाशित केलेल्या बालसाहित्यासाठी परांजपे सरांनी कथाचित्रांचंही काम केलं.
watercolour, acrylic, pastel, oil, ही पारंपरिक माध्यमं ते लिलया हाताळत पण scraperboard
वरही त्यांची हुकमत अभूतपूर्व अशीच होती.
ब्रश इतक्याच सराईतपणे ते ब्लेडच्या सहाय्यानेही इलस्ट्रेशन्स करीत असत. जसा फाइन आर्टिस्ट pallet knifeच्या साहाय्याने काम करतो अगदी तसा! परांजपे सरांना एखाद्या प्रसंगाचे चित्र काढायचे असेल तर त्यांना कुठल्याही रेफरन्सची गरज भासत नसे.
मॉडर्न आर्ट किंवा अमूर्त चित्रकला प्रकाराकडे परांजपे सर फारसे वळलेले दिसत नाहीत. अर्थात त्या प्रकारांशी त्यांचं वावडं होतं असंही नाही, परंतु त्यांचा मुख्य कल हा वास्तवदर्शी चित्रांकडेच होता, हे त्यांच्या एकूण कामाचा आढावा घेतला तर लक्षात येतं. त्यांच्या आवडीचे पाश्चिमात्य चित्रकार म्हणजे Bob Peak, Bart forbes, Eric Earnshaw, Bernie Fuchs, Mark English, Joe Bowler Paul Davis, Al Parker हे होते.
चित्रकार म्हणून जसे ते ग्रेट होते तसेच ते माणूस म्हणूनही आदरणीय होते. त्यांना संगीताची भारी आवड होती. विशेष करून कुमार गंधर्व, भीमसेन जोशी यांसारख्या गायकांच्या गायकीने ते मंत्रमुग्ध होत, त्यात ते अगदी समरसून जात. अशीच समरसता आणि लयबद्धता त्यांच्या कामातून विशेषत्वाने त्यांच्या कुंचल्याच्या स्टोक्समधूनही आपल्याला पदोपदी जाणवते.
----------------------------------------------------
फोटो-----49013, 49011, 49012

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com