pune zp
pune zpsakal

Zp Recruitment : पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतीला अडथळा ‘सॉफ्टवेअर’चा

पुणे जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील रिक्त पदांची भरतीची प्रक्रिया सुरु होण्यास ‘संगणक प्रणाली’चा (सॉफ्टवेअर) अडथळा निर्माण झाला आहे.

पुणे - पुणे जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील रिक्त पदांची भरतीची प्रक्रिया सुरु होण्यास ‘संगणक प्रणाली’चा (सॉफ्टवेअर) अडथळा निर्माण झाला आहे. राज्य सरकारने या भरतीसाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्याचा आदेश संबंधित कंपनीला दिला आहे. त्यानुसार या कंपनीने याबाबतचे सॉफ्टवेअर विकसित करण्यास सुरवात केली आहे. मात्र हे सॉफ्टवेअर पूर्ण होऊन, त्याची चाचणी यशस्वी झाल्याशिवाय जिल्हा परिषदेला या कर्मचारी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करता येणार नसल्याचे उघडकीस आले आहे. यावरून पुणे जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया ही सॉफ्टवेअरच्या प्रतिक्षेत अडकली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची कर्मचारी भरती मागील सुमारे दहा वर्षांपासून रखडलेली आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्याचे संकेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने डिसेंबर २०२२ मध्येच दिले होते. यानुसार जानेवारी २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याची घोषणाही ग्रामविकास विभागाने केली होती. मात्र या घोषणेला आता पाच महिन्यांचा कालावधी लोटून गेला आहे. तरीही अद्यापही या भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकलेली नाही.

pune zp
Pune News : नवरा वेळ देत नाही, बायकोने थेट IT कंपनीला दिली बॉम्ब ठेवल्याची धमकी...

अशी आहे स्थिती

- राज्याच्या ग्रामविकास विभागाने या भरतीच्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी विविध सहा राज्यस्तरीय समित्यांची स्थापना केली होती.

- या समित्यांनी या परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करून दिला आहे.

- या अभ्यासक्रमाला मंजुरी देत, भरतीबाबतची मार्गदर्शक नियमावलीही ग्रामविकास विभागाने तयार करून १५ मे २०२३ रोजी जिल्हा परिषदेला पाठविली आहे.

- जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची २०१६ पासून आतापर्यंत एकदाही भरती झालेली नाही.

- पूर्वी ही प्रक्रिया दरवर्षी जुलै महिन्यात सुरु केली जात असे.

- क वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने महाभरती अंतर्गत मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ अशी दोन वेळा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.

- परंतु या दोन्ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने आक्टोबर २०२२ मध्ये रद्द केल्या आहेत.

- त्यानंतर क वर्ग संवर्गातील रिक्त पदांचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यात ८९९ जागांची भरती

सद्यःस्थितीत पुणे जिल्हा परिषदेतील विविध विभागांमधील मिळून क वर्गातील ८९९ जागा रिक्त आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा परिषद संभाव्य कर्मचारी भरतीत या सर्व जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. या रिक्त जागांमध्ये प्रामुख्याने आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी आदी विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे.

pune zp
Pune Development Plan : पुणे विकास आराखड्यास सहा महिने मुदतवाढ

‘आयबीपीएस’कडे काम

दरम्यान, राज्य सरकारने या भरती प्रक्रियेचे काम हे आयबीपीस या कंपनीकडे सोपविले आहे. त्यानुसार या कंपनीच्या वतीने सध्या या भरतीसाठीचे सॉफ्टवेअर (संगणक प्रणाली) विकसित करण्याचे काम सुरु आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे हे काम संपल्यानंतर, पहिल्यांदा त्याची चाचणी (टेस्ट) घेतली जाईल. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच राज्य सरकारच्या परवानगीने जिल्हा परिषदेला याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार आहे.

जुलैच्या मध्यापर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार?

ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेला जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. या परवानगीनंतरच जाहिरात प्रसिद्ध करता येणार आहे. यानुसार जिल्हा परिषद भरतीची जाहिरात हे जूलै महिन्याच्या मध्यापर्यंत प्रसिद्ध होण्याची शक्यता ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com