अवघा रंग एक झाला...

अवघा रंग एक झाला...

पुणे, ता. १४ ः धोतर, कुर्ता, डोक्यावर टोपी...कपाळी चंदनाचा टिळा आणि अबीर बुक्का...हातात टाळ आणि मुखी हरिनामाचा जयघोष...हे वर्णन वारकऱ्यांचे वाटत असले तरी बुधवारी (ता. १४) सकाळी समस्त पुणेकर याच वेशात दिसत होते. वारकऱ्यांसमवेत हे पुणेकर भक्तिरसात तल्लीन झाले होते. ‘विठ्ठल’ या एका ध्वजाखाली एकत्र आलेल्या या भाविकांना पाहून ‘अवघा रंग एक झाला...’ असाच प्रत्यय येत होता.
निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूहातर्फे’ आयोजित ‘साथ चल’ उपक्रमाचे. पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्यांच्या साक्षीने पुणेकरांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ या उपक्रमात घेतली. यानिमित्ताने प्रत्यक्ष आषाढी वारीत सहभागी होता न आल्याची खंत त्यांनी दूर केली. त्यासाठी पुरेपूर तयारीसह पहाटेपासूनच पूलगेट येथील महात्मा गांधी बसस्थानकावर पुणेकरांनी जमण्यास प्रारंभ केला होता. विशेष म्हणजे, विविध क्षेत्रातील आणि वयोगटांतील व्यक्ती यात सहभागी झाल्या असल्या तरी ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ म्हणत सगळे एकदिलाने विठ्ठलभक्तीत एकरूप झाले होते.
पालख्यांचे मार्गक्रमण होत असल्याने वारकरी काही क्षणासाठी येथे थांबून विसावा घेत होते. या वारकऱ्यांकडील तुळशी वृदांवन काही क्षण आपल्या डोक्यावर घेत, तसेच टाळ आणि मृदंग हाती घेत पुणेकरांनी वारीची अनुभूती घेतली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे वाटेवर दर्शन होताच सगळ्यांनी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष केला. काही पुणेकर पालख्यांसह थोडे अंतर चालत देखील गेले.
गणवेशातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिस्त पाळत, परंतु अतिशय जल्लोषात या वारीत सहभाग घेतला. हास्ययोग परिवाराच्या सदस्यांनी आपल्या अनोख्या पद्धतीने वारीचा आनंद घेतला. सामाजिक संस्थांनी-संघटनांनी यानिमित्ताने सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला. हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू होती. अनेकांनी ‘सेल्फी’ टिपत ही आठवण छायाचित्रात बंदिस्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com