हवाईदल करणार धावपट्टी वाढीचा खर्च
पुणे, ता. १६ ः लोहगाव विमानतळाच्या धावपट्टी वाढीसाठी येणारा सुमारे साडेतीनशे कोटी रुपये इतका खर्च हवाई दलाकडून करण्यात येणार आहे, तर लोहगावला जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचे जुलै महिन्यापासून काम सुरू करण्यात येणार आहे. पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात येणारा रस्ता बंद केला जाणार आहे.
धावपट्टीची लांबी वाढल्यास आंतरराष्ट्रीय विमाने उतरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महापालिका व हवाई दलाकडून विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
प्रक्रिया वेगात
- लोहगाव येथील विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यासाठी वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत.
- आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यासाठी आवश्यक धावपट्टी वाढविण्यासाठी हवाई दलाकडून प्रयत्न केले जात आहेत.
- पर्यायी मार्गासाठी महापालिका व हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका, जागेची पाहणी, सर्वेक्षण यावर मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे.
- गुरुवारी महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हवाई दलाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली होती.
- तत्पूर्वी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी तेथे भेट देऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली होती.
- शुक्रवारी पर्यायी रस्त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेचे सर्वेक्षण केले.
- पर्यायी रस्ता करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून तो संरक्षण मंत्रालयास पाठविला जाणार आहे.
- संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर पर्यायी रस्त्याच्या कामाला जुलै महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे.
- धावपट्टीची वाढ करण्यासाठी हवाई दलाला साडेतीनशे कोटी रुपये खर्च येणार आहे.
पर्यायी रस्त्याची लांबी २० मीटर
विकफील्ड ते लोहगाव या रस्त्याला पर्यायी रस्ता करण्याचे काम महापालिका करणार आहे. सध्याच्या रस्त्यापेक्षा पर्यायी रस्ता मोठा असणार आहे. २० मीटर इतकी लांबी या रस्त्याची असणार आहे. त्यामुळे लोहगावकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
़़़़़़़़़
मिसींग लिंक रोडचे काम २५ जूनपासून
विमाननगर ते विमानतळ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी विमाननगर ते विमानतळाच्या एक्झिट गेट’कडील काही जमीन पर्यायी रस्त्यासाठी देण्यास संरक्षण दलाने मंजुरी दिली होती. त्यासाठी २२ गुंठे जमीनही मंजूर करण्यात आली आहे. त्याद्वारे ‘मिसींग लिंक रोड’ जोडला जाणार आहे. या १०० मीटर रस्त्याचे काम २५ जूनपासून सुरु केले जाणार आहे. हे काम १५ ते २० दिवसांत पूर्ण होणार असल्याचे विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.
विमानतळ धावपट्टी वाढीमुळे मोठी विमाने पुण्यात उतरू शकणार आहेत. वाढणाऱ्या धावपट्टीसाठीचा साडेतीनशे कोटी रुपयांचा खर्च हवाईदल करणार आहे. जुलै महिन्यापासून पर्यायी रस्त्याचे काम सुरु केले जाणार आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

