महापालिकेकडून अपेक्षाभंगच!

महापालिकेकडून अपेक्षाभंगच!

कात्रज/पुणे, ता. १८ ः कात्रज व परिसरातील गावे महापालिकेत समाविष्ट होऊन अनेक वर्ष उलटल्यानंतरही विकास आराखड्याअंतर्गतचे (डीपी रोड) रस्ते अद्यापही तयार होण्याची चिन्हे नाहीत. महापालिकेचे होणारे दुर्लक्ष व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या कारणांमुळे रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लागत नाही. परिणामी कात्रज चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याबरोबरच कात्रज व परिसरातील गावांमध्ये आरोग्य केंद्र, शाळा, सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्याकडे महापालिकेचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. मोठ्या अपेक्षेने महापालिकेत समाविष्ट झालो, पण अपेक्षाभंगच झाला, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

डीपी रस्त्यांकडे दुर्लक्ष
- कात्रज १९९७ मध्ये महापालिकेमध्ये समाविष्ट झाले.
- २००५ मध्ये या कात्रज परिसराचा विकास आराखडा तयार झाला, २०१२ मध्ये विकास आराखडा मंजूर झाला.
- मागील काही वर्षांत मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी-कोळीवाडी, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, येवलेवाडी ही गावे महापालिकेमध्ये समाविष्ट झाली.
- मात्र अजूनही कात्रजसाठी मंजूर झालेल्या डीपी रस्त्यांचा पत्ता नाही.

अशी होते अडचण
- कात्रज गावातून थेट कोंढवा रस्त्याला जाण्यासाठी वाहनचालकांना कात्रज चौकातून जाण्याशिवाय पर्याय नाही.
- कात्रज तलाव ते गुजरवाडी रस्ता, गुजरवाडी, शेलारमळा ते कोंढवा रस्ता, माऊलीनगर, निलया सोसायटी ते लेकटाऊन सोसायटी, गोकुळनगर ते अप्पर, खंडोबा मंदिर या मुख्य रस्त्यांसह अन्य पर्यायी रस्त्यांच्या कामे न झाल्याने अडचण
- या रस्‍त्यांची कामे झाली असती तर कात्रज चौकातील तसेच कात्रज कोंढवा रस्त्यावरीलही वाहतूक कोंडीचा ताण कमी होऊ शकतो.


गावे वाढली, शाळांचा अभाव
कात्रज येथे महापालिकेची शाळा आहे. मात्र, कात्रज कोंढवा रस्त्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये महापालिकेच्या शाळांची अक्षरशः वानवा आहे. सर्वसामान्य कुटुंबांमधील विद्यार्थ्यांना एक ते दोन किलोमीटर पायपीट करीत महापालिकेच्या शाळेत पोचावे लागत असल्याची सद्यःस्थिती आहे.

आरोग्य केंद्राकडेही दुर्लक्ष
कात्रज व अन्य समाविष्ट गावांमध्ये महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची कमतरता आहे. संबंधित गावांमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेच्या आरोग्याच्या साई-सुविधा मात्र अजूनही स्थानिक नागरीकांना मिळत नाही.

सांडपाणी, मलनिःसारण कामे अपूर्ण
गुजर निंबाळकरवाडी परिसरात काही ठिकाणी सांडपाणी, मलःनिसारण वाहिन्यांची कामे झाली आहेत. मात्र, ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. मुख्य वाहिनीला जोडण्यासाठी काही मीटर अंतर राहिलेले असतानाही दोन ते तीन लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो, मात्र तो खर्च देखील महापालिका प्रशासन करीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.

कात्रज व समाविष्ट गावांना विकास आराखडा रस्ते, शाळा, आरोग्य केंद्र, सांडपाणी वाहिन्या अशा पायाभूत सोई सुविधा देण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. २०१२ मध्ये डीपी रस्ते मंजूर होऊनही अद्याप ते झालेले नाहीत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे देखील त्याचे एक कारण आहे.
- दीपक गुजर, माची सरपंच, गुजर निंबाळकरवाडी

कात्रज महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय कागदावर घेण्यात आले. मात्र, आजही त्या निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही. महापालिका प्रशासन करवसुलीमध्ये पुढे आहे. मात्र, सोई-सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करत आहे. रस्ते, आरोग्य, पाणी, ड्रेनेज यासारख्या सोई-सुविधा आजही आम्हाला मिळाल्या नाहीत, हे आमचे दुर्दैव आहे.
- सौरभ कदम, स्थानिक नागरिक

कात्रज-कोंढवा परिसरातील विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र, काही रस्त्यांच्या भूसंपादनासंबंधी अडचणी आहेत. संबंधित जागा मालकांशी चर्चा सुरु आहे. बोलणी झाल्यानंतर जागेची मोजणी करून टप्प्याटप्प्याने तसेच निधीच्या उपलब्धतेनुसार आपण रस्त्याची कामे करणार आहोत.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
-------------

गीतेतील कर्मयोगावर विवेचन करताना विनोबा भावे म्हणतात, कर्मयोगी कर्मातच आनंद मानणारा असल्यामुळे सदैव कर्म करीत राहतो. कर्मयोगी स्वयंतृप्त असतो, तरीही कर्म केल्याशिवाय राहत नाही. संत तुकाराम म्हणतात, ‘‘भजनाने देव मिळाला म्हणून का भजन सोडू?’’ कर्माच्या शिडीवर चढून शिखर गाठले, परंतु कर्मयोगी शिखर गाठल्यावरही ती शिडी सोडत नाही. म्हणून सारे संत शिखर गाठूनही साधनाची उत्कटपणे कास धरून राहिले. प्रशासनातील अधिकाऱ्यांनो हा उपदेश लक्षात ठेवा. आपण संत नाहीत. सामान्य माणसं आहोत. आपल्याला नेमून दिलेले कामही साधारण आहे. सर्व साधने हाती असताना ते कामही योग्य पद्धतीने करून सामान्य नागरिकांना सुसह्य जीवन जगण्यास आपण मदत करू शकत नसेल तर आपण नेमके काय करतो?, हा प्रश्‍न स्वतःलाच विचारा. कात्रज व परिसरातील रस्ते, सांडपाणी वाहिन्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांनो याबाबत आल्या सूचना व अनुभव सोबतचा क्यूआरकोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com