दीक्षा ॲप

दीक्षा ॲप

शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची डिजिटल ‘दीक्षा’
राष्ट्रीय पातळीवर ऑनलाइन प्लॅटफॉर्म; ३६ भाषांत ३ लाख व्हिडिओ

सम्राट कदम
सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १८ ः तब्बल १२ अब्ज क्युआर-कोड; सहा हजार ५०० पाठ्यपुस्तके; तीन लाख व्हिडिओ आणि ३६ भाषांमधील शैक्षणिक साहित्य एकाच छत्राखाली मिळण्याचे ठिकाण म्हणजे दीक्षा! देशातील डिजिटल शिक्षणाचे खऱ्या अर्थाने सार्वत्रिकरण करण्याचा विडा दीक्षा या ऑनलाइन प्लॅटफॉर्मने उचलला आहे.
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अध्ययन आणि अध्यापन अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (एनसीईआरटी) ऑनलाइन शिक्षणासाठी DIKSHA नावाचा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, पालक आणि प्राचार्यांच्या दृष्टीने आवश्यक सर्व अध्ययन आणि अध्यापनाचे साहित्य यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाबरोबरच सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांचा पहिले ते १२ वी पर्यंतचा अभ्यासक्रम यात आहे. विशेष म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषाही यात आहे.
---

‘दीक्षा’मध्ये नक्की काय

- उपक्रमशील पाठ्यपुस्तके
- प्रश्नसंच
- इन्फोग्राफिक्स
- इ-अभ्यासक्रम
- हॅन्डबुक्स
- व्हिडिओ, ऑडिओ, एआर आणि थ्रीडी कंटेन्ट
- इंटरॅक्टिव्ह ॲक्टीवीटी
- क्वीझ ॲण्ड ऑनलाइन इव्हेंट
- वर्कशिट
---

दीक्षाची वैशिष्ट्ये
१) मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान ः गणितासारखा विषय हसत खेळत शिकण्यासाठी कवितांपासून कोड्यांपर्यंत विविध घटकांचा समावेश. प्रयोगशील विज्ञान, स्थानिक भाषेतील व्हिडिओ आणि गाणी सुद्धा यात मिळतात.
२) सर्वांसाठी शिक्षण ः सर्व वयोगटातील लोकांसाठी साक्षरतेसाठी आवश्यक कौशल्ये आणि अभ्यासक्रम यात उपलब्ध
३) आभासी प्रयोगशाळा ः अनेक विद्यार्थ्यांना प्रयोगवहीतील प्रयोग समजेलच असे नाही. त्यामुळे दीक्षा ॲपमध्ये आभासी प्रयोगशाळा असून, ज्याद्वारे विद्यार्थी विज्ञानातील अनेक संकल्पना प्रभावीपणे समजून घेऊ शकतील.
४) टीव्ही क्लासेस ः आजपर्यंत रेकॉर्ड करण्यात आलेली टिव्ही क्लासेस आपल्याला यात मिळतात.
---

असा करा उपयोग
ऑनलाइन संकेतस्थळाबरोबरच दीक्षाचे स्वतंत्र ॲपही विकसित करण्यात आले आहे. ॲपमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांसाठी स्वतंत्र रचना करण्यात आली आहे. त्यानंतर आपले बोर्ड नक्की कोणते आहे, कोणत्या इयत्तेतील अभ्यासक्रम हवा अशी माहिती द्यावी लागते. त्यानंतर ॲपमधील या माहितीच्या खजिन्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता.
---
(स्तंभालेख करावा)
दीक्षा ॲपवरील तासिका ः
राज्य ः एकूण तासिका (लाखांमध्ये)
१) कर्नाटक ः ७६
२) राजस्थान ः ४४
३) ओडिसा ः १९
४) उत्तर प्रदेश ः १९
५) मध्य प्रदेश ः ९
६) बिहार ः ७
७) छत्तीसगड ः ६
८) दिल्ली ः ६
९) महाराष्ट्र ः ५
-----
संकेतस्थळ ः https://diksha.gov.in/
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com