कालिदासाची विहंगम दृष्टी...

कालिदासाची विहंगम दृष्टी...

Published on

प्रतिभावंत चित्रकाराला घटनेचा अन्वयार्थ रेषांच्या दृष्य बंधात लागतो, तसा चित्रकलामर्मज्ञ कालिदासाला प्रसंग शब्दांच्या द्वारा दिसतो. रेखाटत असलेला प्रसंग, त्याचे त्या विशिष्ट रचनेच्या आकृतिबंधातील स्थान यांचा त्याला कधीही विसर पडत नाही. आकृतिबंधाची विलक्षण रेखीव आणि कलात्मक जाणीव, त्यासाठी शब्दकळा, कल्पनासमृद्धी आणि कलात्मक संयमामुळे त्याच्या सर्वच साहित्यकृतींना अनुपमेय सौंदर्य आणि सुघड शिल्पाकृतींचे सौष्टव प्राप्त झाले आहे.
- प्रा. डॉ. पंकज भांबुरकर

ज्ञानेंद्रियांच्या संवेदनांपैकी ‘दृश्य संवेदना’ हीच महाकवी कालिदासाची सर्वांत प्रिय संवेदना होय. हे तेजाचे आणि विविध आकार व रंगातील छटांचे त्याला जे आकर्षण आहे, त्यावरून स्पष्ट होते. याच आकर्षणातून कालिदासीय साहित्यात असंख्य कल्पनाचित्रे निर्माण झाली आहेत. महाकवीची कल्पनाशक्ती दृकसंवेदनेशी संबद्ध असलेल्या चित्रांची निर्मिती करणारी आहे. म्हणजे एखाद्या दृक संवेदनेची त्याला प्रतीती झाल्याबरोबर ते सारे दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहते. त्याला ते चित्र साक्षात दिसते आणि अशा चित्राचे लगेच शब्दात रूपांतर होते. ही कल्पनाशक्ती जेव्हा उत्कटावस्थेला पोचते, तेव्हा डोळ्यांसमोर तरळून गेलेल्या दृश्यातील छटाही तो शब्दांच्या साह्याने प्रगट करतो. कालिदासाने रेखाटलेल्या चित्रांमध्ये काही दुरून रेखाटलेली तर काही जवळून पाहून रेखाटलेली आहेत. काही खालून उंचावरची दृश्य तर काही वरून खाली पाहून रेखाटलेली आहेत. काही रंगीत चित्रे आहेत तर काही कृष्ण-धवल !
कालिदासीय काव्य नाटकातील काही उदाहरणे : दुष्यंत राजा स्वर्गातून हेमकूट पर्वतावर उतरत असताना त्याला पृथ्वी कशी दिसली, त्याचे मनोहारी वर्णन अभिज्ञान शाकुंतल नाटकात आहे. रथाचा वेग आणि त्यांचं वर्णन करणाऱ्या दुष्यंताच्या बोलण्यातील आवेग याचं प्रत्ययकारी शब्दांत वर्णन केलं आहे. ‘‘पर्वत जोराने वर येत असल्यामुळे पृथ्वी त्याच्या शिखरांच्या खाली जात आहे, असे वाटते. वृक्षांच्या शाखा दिसू लागल्यामुळे वृक्ष आता पानांनी झाकून गेलेले दिसत नाहीत. लांबून निर्जल वाटणाऱ्या नद्या स्पष्ट दिसू लागल्या आहेत. कोणीतरी हा भूगोल मजजवळ उंच फेकीत आहे, असेच जणू वाटते.’’
कालिदास साहित्यातील निसर्गाची चित्रलिपी वाचण्याकरिता आपलं मन नेहमी सजग असलं पाहिजे. त्यातील आशय जाणला पाहिजे. आत्मिक बळ जोखले पहिजे आणि आशय व आत्मिक बळ दोन्ही आत्मसात करून त्यांना आपल्या कलाकृतीत सन्मानपूर्वक दाखल करून घेतले पाहिजे. याशिवाय, निसर्गाकडे जाताना तुमचे मन ‘मुग्ध -मधू-बाली उतरू दे,’ म्हणजे तुम्ही कलाकृतींमधून रंगवलेला निसर्ग मेघदूतातील अलका नगरीप्रमाणे स्थळहिन आणि कालातीत असेल, त्याला इतिहास-भूगोलाचा आधार नसेल, तेथे वास्तवातील गणित गैर लागू पडेल.
कालिदासीय साहित्यातील दृश्ये पाहिल्यानंतर एखादेच मोहक व वेचक विशेषण, एखादी उपमा किंवा एखादे रूपक यांच्याद्वारे कवी वाचकांच्या डोळ्यांसमोर एखादे दृश्य यथातथ्यपणे उभे करू शकतो, याची खात्री पटते. कल्पना चित्र रेखाटण्यासाठी किंवा रंगविण्यासाठी संपूर्ण वर्णनाची आवश्यकता असते, असे मुळीच नाही. विशेषणामुळे, उपमेमुळे किंवा रूपकामुळे वाचकाची कल्पनाशक्ती जागरूक होते व ती आपला विलास दाखवू लागते. यामुळे उपमा किंवा रूपक वापरत असताना कालिदासाच्या डोळ्यांसमोरून जे दृश्य तरळून गेलेले असेल, तेच किंवा त्यासारखे दृश्य वाचकांच्याही डोळ्यांसमोरुन तरळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.