बीबीए, बीसीएसाठी पुरवणी सीईटी घ्या

बीबीए, बीसीएसाठी पुरवणी सीईटी घ्या

पुणे, ता. ८ : राज्यातील बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांबद्दल कमालीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हे अभ्यासक्रम आपल्या अखत्यारीत घेतले असून, नियमानुसार प्रवेश परीक्षाही (सीईटी) पार पडली आहे. मात्र, याबद्दल पुरेशी जनजागृती न केल्यामुळे अनेक इच्छुक विद्यार्थी सीईटीपासून वंचित राहीले आहेत. विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेता पुन्हा सीईटी घेण्याची मागणी शैक्षणिक वर्तुळातून करण्यात आली आहे.

राज्यात बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमांना जवळपास एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात. यंदा प्रथमच सीईटीद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र, सीईटीसाठी फक्त ५० हजारांच्या आसपास अर्ज आले. तेवढ्याच विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा पार पडली. त्यामुळे जवळपास अर्ध्याहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काही संस्थाचालक आणि प्राचार्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांसह मुख्य सचिवांनाही पत्र लिहीत पुरवणी सीईटी परीक्षेची मागणी केली आहे.

प्रमुख मागण्या
१) पुरवणी प्रवेश परीक्षा लवकर आयोजित करण्यात यावी
२) बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा लागू केल्याचे हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून या वर्षी सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्याची मुभा द्यावी

पुरवणी परीक्षेची गरज का?
- इयत्ता बारावीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी बीबीए, बीसीए आदी अभ्यासक्रमांना प्रवेशाचा निर्णय घेतात
- रोजगाराभिमुख आणि परवडणाऱ्या दरातील अभ्यासक्रम म्हणून विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असते. मात्र, यंदा पुरेशा जनजागृतीअभावी विद्यार्थी सीईटीला मुकले
- विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने पुन्हा जनजागृती करत पुरवणी सीईटी घेण्याची गरज

सीईटीच्या अभावी विद्यार्थी इच्छा असूनही प्रवेश घेण्यापासून वंचित राहणार आहेत. पर्यायाने महाविद्यालयांचेही आर्थिक गणित कोलमडणार असून, विद्यार्थी हिताच्या दृष्टीने पुरवणी प्रवेश परीक्षा घ्यावी. तसेच रिक्त जागांवर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुभा द्यायला हवी.
- प्रा. श्यामकांत देशमुख, कार्यवाह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com