

पुणे, ता. २२ : शहरासह उपनगरांमध्ये अभ्यासिकांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या असलेल्या आणि नव्याने उभारण्यात येणाऱ्या अभ्यासिकांमुळे नवी अर्थव्यवस्था उभी राहू पाहत आहे. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी जवळपास आठ ते बारा तास अभ्यासिकांमध्ये असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अभ्यासिकांमधील सुरक्षितता महत्त्वाची आहे. म्हणून आता शहरात वसतिगृहे, ग्रंथालये यांच्या धर्तीवरच अभ्यासिकांसाठी देखील स्वतंत्र नियमावली करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली जात आहे. यात आता महापालिका प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
मागील आठवड्यात नवी पेठेतील एका अभ्यासिकेला आग लागण्याची घटना घडली. त्यात अभ्यासिकेतील सर्व पुस्तके आणि फर्निचर जळून खाक झाले. या घटनेमुळे शहरातील अभ्यासिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. सध्या शहरात शॉप ॲक्ट किंवा उद्योग आधार यांचा आधार घेऊन व्यावसायिक अभ्यासिका सुरू केल्या जात आहेत. याचा आधारे अनेकांनी व्यावसायिक जागेत अभ्यासिका सुरू केल्या आहेत. परंतु, मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये अनेक अभ्यासिका या निवासी क्षेत्रात देखील सुरू आहेत.
अभ्यासिकांची संरचना, त्यानुसार विद्यार्थ्यांची क्षमता, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा आणि त्यांची सुरक्षितता, याबाबत सध्या कोणतेही अधिकृत नियम नाहीत. परंतु, शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाने अभ्यासिकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
नियमावलीत हे मुद्दे असावेत
- अभ्यासिकेच्या एकूण जागेनुसार विद्यार्थ्यांच्या आसन क्षमतेचे निकष ठरविण्यात यावेत
- आसन क्षमतेच्या निकषांचे पालन अभ्यासिकांना करणे बंधनकारक असावे
- अभ्यासिकेची जागा आणि त्यातील सुविधांबाबत स्पष्टता असावी
- विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय हे बंधनकारक असावे
- अभ्यासिकेत आकारण्यात येणाऱ्या भाड्यानुसार सुविधा कमी-जास्त असाव्यात
अभ्यासिका आणि वसतिगृहे ही दोन्हीही व्यावसायिक ठिकाणे आहेत. या दोन्ही ठिकाणी प्रती व्यक्ती भाडे आकारले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अभ्यासिकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
- प्रशांत उमरदंड, पुणे
नुकतीच घडलेली घटना पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अभ्यासिकांसाठी स्वतंत्र नियमावली असणे नितांत गरजेचे आहे. तसेच, एखाद्या अभ्यासिकेमार्फत विद्यार्थ्यांना अपुरी सुविधा पुरविण्यात येत असल्यास त्यांना विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी विद्यार्थ्यांचे पैसे परत केले पाहिजे, असेही त्या नियमावलीत स्पष्ट असायला हवे.
- भूषण गोरे, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.