अवघड प्रश्नांची उजळणी अन् लिखाणाचा सराव करा
पुणे, ता. १७ : दरवर्षीच्या तुलनेत यंदा दहावी-बारावीची परीक्षा जवळपास १० दिवस अगोदरच सुरू होणार आहे. बारावीच्या परीक्षेला ८६ दिवस, तर दहावीच्या परीक्षेला ९६ दिवस शिल्लक राहीले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शाळेत झालेल्या अभ्यासाची आणि अवघड वाटणाऱ्या प्रश्नांची उजळणी करण्यास आणि लिखाणाचा सराव करण्यास सुरूवात करावी, असा सल्ला शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा यापूर्वीच जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, बारावीची लेखी परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) ११ फेब्रुवारी आणि दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अर्थात, राज्य मंडळातर्फे लवकरच सविस्तर आणि अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. परंतु, यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे बारावीच्या परीक्षेला अवघे ८६ आणि दहावीच्या परीक्षेला ९६ दिवस राहिले आहेत. त्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीचा वेग येणार आहे.
दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरू होतात, त्यावेळी शिक्षकांचा दहावी-बारावीचा अभ्यासक्रमातील ९० टक्के भाग शिकवून झालेला असतो. डिसेंबर उजाडताच, अभ्यासक्रम पूर्ण होऊन विद्यार्थी उजळणी करायला सुरूवात करतात. परंतु, यंदा परीक्षा लवकर सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना उजळणीचे नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे, असे रानमळा (बेल्हे) येथील श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूलमधील विज्ञान शिक्षक रमेश मालुंजकर यांनी सांगितले.
यांना सांगितले.
शिक्षकांनी दिलेल्या टिप्स...
१. पाठ्यपुस्तकाचे पुन्हा सविस्तर वाचन :
शाळेमध्ये संबंधित विषयांचे धडे शिकवून झाले असणार आहेत. विद्यार्थ्यांनी बारकाईने ते धडे पुन्हा वाचावेत. धडे वाचताना, समजून घेताना काही अडचण असल्यास शिक्षकांचे वेळीच मार्गदर्शन घ्यावे.
२. अभ्यासाचे वेळापत्रक :
दहावी-बारावीचे अनेक विद्यार्थी वर्षाच्या सुरूवातीपासूनच अभ्यासाचे वेळापत्रक करतात. परंतु तुम्ही अद्याप हे वेळापत्रक केले नसल्यास दिवसभरात कोणत्या विषयाचा आणि किती वेळ अभ्यास करायचा, याचे आत्ताच नियोजन करा. जेणेकरून परीक्षेच्या तयारीच्या शेवटच्या टप्प्यात ताण येणार नाही.
३. अभ्यासासोबत नियमित व्यायाम :
अभ्यास करताना अनेकजण खेळणे, व्यायाम करणे टाळतात. परंतु बोर्डाच्या परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज नियमित व्यायाम, आवडते खेळ प्रकार आणि ध्यानधारणा, प्राणायाम करणे आवश्यक आहे.
४. अभ्यासाची उजळणी :
शिक्षकांनी शिकविलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी दररोज नियमितपणे करणे गरजेचे आहे. जेणेकरून परीक्षेपर्यंत उजळणी चांगली झाल्यास पेपर सोडविणे सोपे जाते.
५. प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव :
परीक्षा काही दिवसांवर आल्यानंतर विद्यार्थी गेल्या काही वर्षातील प्रश्नपत्रिका सोडविण्यास घेतात. परंतु, आताच विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविण्याचा सराव करावा. जेणेकरून प्रत्यक्ष परीक्षेत वेळेत पेपर सोडविणे शक्य होईल.
६. योग्य मार्गदर्शन घ्या :
अनेकदा विद्यार्थी बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक साहित्याचा आधार घेतात. परंतु, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन घेऊनच परीक्षेची तयारी करणे अपेक्षित आहेत. अभ्यासक्रम समजून घेताना काही शंका असतील, तर त्याचे निरसन शिक्षकांकडून करून घ्यावे.
दहावी-बारावीचा अभ्यासक्रम डिसेंबरपर्यंत शिकवून पूर्ण होतो. परंतु विद्यार्थ्यांनी दिवाळीनंतर खऱ्याअर्थाने बोर्डाच्या परीक्षेची तयारी करण्यास सुरूवात करावी. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लक्षात घेऊन, वेळेत प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी आतापासूनच सराव करावा. तसेच, शिकवून झालेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करताना, काही अडचण आल्यास शिक्षकांना विचारावे. पाठ्यपुस्तकाचे वाचन व्यवस्थित करावे, त्यातील गुणदान समजून त्या-त्या धड्याचे वाचन करावे. लिखाणासह गणितात विशेषत: भूमिती रचना आणि तारांकित प्रमेयांचा सराव करणे अपेक्षित आहे.
- महेंद्र गणपुले, निवृत्त मुख्याध्यापक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

