प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
पुणे, ता. १७ : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सोमवारी (ता. १८) होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी रविवारचे निमित्त साधत थेट मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) नेत्या मायावती, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट वगळता केंद्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांनी आज पुण्यात हजेरी लावली नाही. मात्र, उमेदवारांनीच आज प्रचारफेऱ्या आणि पदयात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडविला.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होत आहे. तर सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराची सांगता होत आहे. गेल्या आठवडाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, औद्योगिक व पुरवठा मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन डझनहून अधिक मंत्र्यांनी प्रचारासाठी शहरात हजेरी लावली.
आरोप-प्रत्यारोप
सभा आणि प्रचारफेऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोपाने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यामुळे दिवाळीनंतरचा आणि प्रचाराची सांगता होण्यापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे अखेरची संधी साधत आज शहरात जोरदार प्रचाराचा धुरळा उडविला. जरी नेत्यांनी शहराकडे पाठ फिरविली तरी उमेदवारांनी आज पदयात्रा आणि प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून थेट मतदारांच्या गाठीभेटीवर भर देत मतदार संघ पिंजून काढला.
प्रचाराच्या मैदानात मायावती, पायलट
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील बसपाचे उमेदवार हुलगेश चलवादी यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची सभा झाली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यापाऱ्यांचा मेळावा घेऊन संवाद साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कोथरूड येथे सभा होती. परंतु ती ऐनवेळी रद्द झाली. तर कर्नाटकचे खाणमंत्री मगन रेड्डी यांचा दौराही रद्द झाला.
डोक्यावर टोप्या अन् हातात झेंडे
हलगी-ताशा वादन, डोक्यावर टोप्या, हातात झेंडे, गळ्यात मफलर घालून शहरात दिवसभर उमेदवारांचा जयघोष पहावयास मिळत होता. अधिकाधिक प्रत्यक्ष मतदारांपर्यंत कसे पोचता येईल, यावर राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी प्रयत्न केला. त्यामुळे पदयात्रा आणि प्रचारफेऱ्यांनी रविवारचा दिवस संपला. प्रचाराची सांगता रॅलीच्या माध्यमातून करण्याचे नियोजन पक्षाच्या उमेदवारांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

