प्रचार सांगतेसाठी दिग्गज पुण्यात
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १७ : महायुती आणि महाविकास आघाडी यांनी प्रतिष्ठेच्या बनविलेल्या पुणे शहरासह जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराची सांगता उद्या (ता. १८) केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या उपस्थित होणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर विनेश फोगाट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या तोफांची अखेरची सलामी देऊन प्रचाराची सांगता होणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीने अतिशय प्रतिष्ठेच्या बनविलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता उद्या सायंकाळी सहा वाजता होणार आहे. गेल्या दहा दिवसांत आरोप-प्रत्यारोपाने निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला. देशपातळीवर अनेक नेत्यांनी हजेरी लावली. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है ते सेफ है’ पासून ‘संविधान बचाव’, ‘गद्दारी’ पर्यंतच्या मुद्यांवर या निवडणुकीच्या चर्चेच्या फैरी झडल्या. ‘लाडकी बहीण योजना’ निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिली. या योजनेवरून दावे-प्रतिदावे करण्यासाठी महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातील नेत्यांची उपस्थिती हा देखील या निवडणुकीतील औसुक्याचा विषय ठरला.
पुण्यासह जिल्ह्यात रविवारी अनेक नेत्यांनी हजेरी लावली. आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि सिनेअभिनेते पवन कल्याण, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, माजी मुख्यमंत्री मायावती, पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या सभेने वातावरण ढवळून निघाले.
दरम्यान, महायुतीच्या पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, मुरलीधर मोहोळ पुण्यात दाखल होत आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर विनेश फोगाट मैदानात उतरून प्रचाराची सांगता करणार आहेत. चाकण व मुळशीतील कासार आंबोली येथे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची तोफ धडाधडणार आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची नारायणगाव येथे सभा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

