कारभारी ठरविण्यासाठी आज मतदान
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १९ : पुढील पाच वर्षांसाठी शहरासह जिल्ह्याचा कारभारी ठरविणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (ता. २०) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मतदान केंद्रांवर ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोईचे जावे, यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, सहाय्यक म्हणून ठेवण्यात येणार आहे. तसेच या मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी आवश्यकता असल्यास, सरकते जिने आणि प्रत्येक केंद्रावर पाच चाकाच्या खुर्च्या, अशा तीन हजार ७५० चाकांच्या खुर्च्यांचे नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
एका मतदान केंद्रावर साधारणतः एक हजार मतदार याप्रमाणे आठ हजार ४६२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदानाला विलंब होवू नये, गर्दी होऊ नये म्हणून सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी ६० गृहनिर्माण संस्थांमध्ये १२६ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून प्रथमोपचार कक्ष, औषधे ठेवण्यात आली आहेत तर २०० रुग्णालयांसोबत करार करण्यात आले आहेत.
मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, मदत कक्ष, स्वच्छतागृह, वीज तसेच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था असणार आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी - कर्मचाऱ्यांना किंवा मतदारांना तातडीने वैद्यकीय सुविधेची आवश्यकता भासल्यास वैद्यकीय विमा अंतर्गत ‘कॅशलेस’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी हे करा...
- Voter Helpline ॲप
- www.ceo.maharashtra.gov.in
- https://electoralsearch.in
- दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी ॲप
- ‘व्होटर हेल्पलाइन -१९५०’ या क्रमांकावर एसएमएस करा
- १९५० टोल फ्री क्रमांक
गुगल मॅपवर पहा मतदान केंद्र
- गुगल मॅपमध्ये सर्व मतदान केंद्रे गुगल टॅग करण्यात आली आहेत
- गुगल मॅपमुळे मतदारांना मतदान केंद्र नेमके कुठे आहे, हे समजणार आहे
मतदानाला जाताना खालीलपैकी एक ओळखपत्र दाखवा
१) मतदार ओळखपत्र
२) पारपत्र (पासपोर्ट)
३) वाहन चालक परवाना
४) छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य-केंद्र सरकार, सार्वजनिक उपक्रम,
सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
५) छायाचित्र असलेले बँकांचे, टपाल कार्यालयाचे पासबुक
६) पॅनकार्ड
७) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) महसूल निर्मिती
निर्देशांकाद्वारे (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) दिलेले स्मार्टकार्ड
८) मनरेगा जॉबकार्ड
९) कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
१०) छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तावेज
११) खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
१२ आधार कार्ड
पक्षाचे नाव-चिन्ह असलेल्या मतदार चिठ्ठ्यांना मज्जाव
मतदानाच्या दिवशी मतदारयादीत नाव शोधून देण्यासाठी राजकीय पक्षांकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते. मतदान केंद्रांच्या परिसरात गर्दी होऊ नये म्हणून केंद्रापासून २०० मीटर दूरवर व्यवस्था करण्याचे
आदेश देण्यात आले आहेत. एक टेबल, दोन खुर्च्या आणि दोन मदतनीस अशी मुभा देण्यात आली आहे. याठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाचे चिन्ह, नाव किंवा मतदार चिठ्ठ्या वाटप करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
मतदान केंद्रांच्या ठिकाणी अशी असेल व्यवस्था
- जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये ८,४६२ मतदान केंद्र
- २०७ मतदान केंद्रांतील ठिकाणांमध्ये बदल
- ४५ सहाय्यकारी मतदान केंद्र
- तीन हजार ५०० वाहने असून त्यामध्ये १७२० बस, ४२० कंटेनर, उर्वरित जीप
- दीड हजार मतदान केंद्रांवर पाळणाघरे
- ९६ मतदान केंद्रांवर पडद्यांपासून तयार केलेले कक्ष. या ठिकाणी तपासणीसाठी महिलांची नियुक्ती
- १९७० मार्गांवर बस धावणार
- २१ मतदारसंघांत प्रत्येकी एक असे सखी मतदान केंद्र, युवक मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र
पुणे शहरातील मतदारसंघ
मतदारसंघ - उमेदवारांची संख्या - मतदारांची संख्या
वडगाव शेरी - १६ - ५,०३,५३९
शिवाजीनगर - १३ - २,९५,११७
कोथरूड - १२ - ४,४०,५५७
खडकवासला - १४ - ५,७६,५०५
पर्वती - १५ - ३,६०,९७४
हडपसर - १९ - ६,२५,६७५
पुणे कँटोन्मेंट - २० - २,९५,३८२
कसबा पेठ - १२ - २,८३,६३५
एकूण - १२१ - ३३,८१,३८४
ग्रामीण भागातील मतदारसंघ
मतदारसंघ - उमेदवारांची संख्या - मतदारांची संख्या
जुन्नर - ११ - ३,२५,७६४
आंबेगाव - ११ - ३,१४,२५२
खेड - आळंदी - १३ - ३,७६,६२३
शिरूर - ११ - ४,६६,०४२
दौंड - १४ - ३,१९,३११
इंदापूर - २४ - ३,४१,४८५
बारामती - २३ - ३,८०,६०८
पुरंदर - १६ - ४,६४,०१७
भोर - ६ - ४,३०,२७८
मावळ - ६ - ३,८६,१७२
एकूण - १३५ - ३४, १८,३८०
पिंपरी - चिंचवडमधील मतदारसंघ
मतदारसंघ - उमेदवारांची संख्या - मतदारांची संख्या
चिंचवड - २१ - ६,६३,६२२
पिंपरी - १५ - ३,९१,६०७
भोसरी - ११ - ६,०८,४२५
एकूण - ४७ - १६,६३,६५४
खालील आकडे मोठे करावेत
शहर, जिल्ह्यातील मतदारांची संख्या
- पुरुष मतदार : ४५ लाख ७९ हजार २१६
- महिला मतदार : ४२ लाख ६९ हजार ५६९
- तृतीयपंथी मतदार : ८०५
- एकूण मतदार : ८८ लाख ४९ हजार ५९०
उमेदवारांची संख्या
- पुणे शहर - १२१
- जिल्हा (ग्रामीण) - १३५
- पिंपरी - चिंचवड - ४७
- एकूण उमेदवार - ३०३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

