गुन्हे वृत्त
पिस्तूल बाळगणाऱ्या
दोघा सराईतांना अटक
पुणे, ता. १९ : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुलासह चार काडतुसे जप्त केली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रितेश बाबासाहेब कसबे (वय १८, रा. तरवडे वस्ती, महम्मदवाडी रस्ता, हडपसर) आणि राहुल संजय चौधरी (वय २१, रा. हडपसर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. काळेपडळ ठाण्यातील तपास पथकातील पोलिस गस्त घालत होते. त्यावेळी दोघा सराईत गुन्हेगारांकडे पिस्तूल असून, ते तरवडे वस्ती भागात गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलिस अंमलदार दाऊद सय्यद, अमोल काटकर, परशुराम पिसे, श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे अतुल पंधरकर यांनी ही कारवाई केली.
-----
प्रेमसंबंधास नकार दिल्याने
मित्राकडून तरुणीची बदनामी
पुणे, ता. १९ : प्रेमसंबंधास नकार दिल्यामुळे एका तरुणीचे समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी तरुणीच्या मित्राविरुद्ध (वय २४) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २१ वर्षीय तरुणीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि तरुणीची मैत्री होती. तरुणीने आरोपीला प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने तरुणीच्या नावे समाज माध्यमावर बनावट खाते उघडले. त्या समाज माध्यमावर तरुणीचे अश्लील छायाचित्रे, मजकूर आणि मोबाईल क्रमांक प्रसारित केला. याबाबत तरुणीने जाब विचारला असता, आरोपीने तरुणीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम करीत आहेत.
----------
शहरात अवैध गुटखा
विक्री; एकास अटक
पुणे, ता. १९ : शहरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याची विक्री सुरू आहे. स्वारगेट पोलिसांनी मुकुंदनगर भागात एका टेम्पोतून सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा गुटखा, पानमसाला जप्त केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण यांनी फिर्याद दिली. त्यावरून स्वारगेट पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली. शाहबाज इलियास खान (वय २४, रा. गुलटेकडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. टेम्पोतून दोन लाख ७७ हजार रुपये किमतीचा गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला. दरम्यान, गुटखा विक्रीवर बंदी असूनही शहरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.
------------
जुगार अड्ड्यावर छापा;
१६ जणांविरुद्ध गुन्हा
पुणे, ता. १९ : कात्रज परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि रोकड असा एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी जुगार अड्डा चालकासह १६ जणांविरुद्ध मुंबई जुगार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरात जांभूळवाडी भागात एका इमारतीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. भारती विद्यापीठ पोलिसांनी तेथे छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी तेथून जुगाराचे साहित्य, १६ मोबाईल आणि रोकड असा मुद्देमाल जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

