थंडीमुळे आहारात करा बदल

थंडीमुळे आहारात करा बदल
Published on

पुणे, ता. २४ : सध्‍या पुण्यातील तापमानाचा पारा १३ अंशांच्‍या जवळपास असून, बोचरी थंडी अंगाला झोंबायला सुरुवात झाली आहे, परंतु याचबरोबर आणखी एक बदल जाणवत आहे तो म्‍हणजे अचानक भूकही वाढण्‍यास सुरुवात झाली आहे. परंतु, ही भूक वाढण्‍याचे कारण म्‍हणजे हिवाळ्यात थंड हवामानामुळे शरीराचे तापमान कमी होते व भूक उत्तेजित होते. म्‍हणून या काळात नेहमीपेक्षा आहारात थोडा बदल करून आहार घ्यावा, असा सल्‍ला आहारतज्ज्ञ व आयुर्वेदतज्‍ज्ञांनी दिला आहे.
तीनही ॠतूंपैकी हिवाळा हा ऋतू शरीराच्‍या आरोग्यासाठी उत्‍तम समजला जातो. या काळात थंड व आंबट पदार्थ प्रकर्षाने टाळायला हवेत. ज्‍यांचे वजन कमी आहे किंवा शरीरयष्‍टी कृश आहे त्‍यांच्‍यासाठी हा काळ तर वजन वाढवण्‍यासाठीही उपयुक्‍त आहे. त्‍यांनी गोड पदार्थ खावेत. या काळात बाजरीची भाकरी खायला हवी. पालेभाज्‍या, फळभाज्‍या खाव्‍यात, परंतु कडधान्‍ये कमी खावेत. कारण, त्‍याने वात व रुक्षता वाढते, असा सल्‍ला तज्‍ज्ञ देतात.

हे लक्षात ठेवा
- स्निग्ध पदार्थ, उष्‍ण पदार्थ, तूप, मसालेयुक्‍त पदार्थांचे प्रमाण वाढवावे
- ज्‍वारी किंवा बाजरीची भाकरी, पालेभाज्‍या, फळभाज्‍यांबरोबरच गोड पदार्थ वाढवण्‍यास हरकत नाही
- सॅलड, तिळाची चटणी, जवसाची चटणी खावी
- चिमूटभर सूंठ टाकून कोमट पाण्यात टाकून पीत राहावे त्‍याने प्रतिकारशक्‍ती वाढण्‍यास मदत होते.
- सर्दी-खोकला कमी होण्‍यास मदत
- सकाळी नेहमीच्‍या चहाऐवजी तुळशीचे पाने, दालचिनी, मिरे, लवंग, चिमूटभर सुंठ पावडर टाकलेला मसाला चहा घ्यावा
- व्‍यायाम करावा

काय खाऊ नये?
- थंड पदार्थ जसे थंड पाणी, आइस्क्रीम खाणे टाळावे
- ज्‍यांना कफ होतो त्‍यांनी दही, ताक, तुरट व आंबट पदार्थ घेणे टाळावे
- वांगी, बटाटे, मटकी या भाज्‍या शक्‍यतो टाळाव्‍यात

हिवाळ्यात पाचक अग्‍नीचे बाहेरील थंडीने दीपन होते व त्‍यामुळे भूक लागते. या काळात वात वाढण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. दोषांच्‍या प्रमाणे आहार घेतल्‍यास अवयवांचे दुखणे कमी होते. ज्‍यांची शरीरयष्‍टी कृश आहे त्‍यांना वजन वाढवण्‍यासाठी चांगला काळ आहे. तिळाच्या तेलाने त्‍वचेला चांगली मालिशही करावी व अंघोळ करावी. हिवाळ्यात सर्दी-खोकला वाढत असल्‍याने थंड पदार्थ खाणे टाळावे.
- डॉ. संगीता वाघमोडे, आयुर्वेदतज्‍ज्ञ

ऋतूनुसार फळे खाल्ल्यामुळे त्यांचा सर्दी-खोकल्यासारखा त्रास होत नाही. भाज्यांचे घरी केलेली गरम सूप थंडीमध्ये अधिक लाभदायक ठरतात. पारंपरिकरीत्या थंडीमध्ये केले जाणारे मेथीचे लाडू, डिंक लाडू ज्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ अधिक प्रमाणात असतात ते खावेत. हे लाडू करताना गोडव्यासाठी साखरेऐवजी गूळ, खजूर, खारीक हे वापरले तर अधिक पौष्टिक ठरेल. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. जे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, केसांचे, त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे त्याचाही आहारात समावेश करावा.
- कस्तुरी भोसले, आहारतज्‍ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com