

पुणे, ता. २४ : पुण्यासह राज्यात इन्फ्लूएंझा (स्वाइन फलू) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, सार्वजनिक आरोग्य विभागाने यावर्षीपासून जोखीमग्रस्त रुग्णांना सरकारी रुग्णालयांतून मोफत इन्फ्लूएंझा लसीकरण सुरू केले. त्यामध्ये पुणे परिमंडळासाठी (पुणे, सातारा, सोलापूर) १३ हजार डोस वितरित केले आहेत. मात्र, यावर्षी पुणे परिमंडळात केवळ नऊ जोखीमग्रस्त रुग्णांना लस दिली आहे. तर, राज्यात ४५ हजार डोस वितरित केले असून, त्यापैकी यावर्षी केवळ २६०८ जोखीमग्रस्त रुग्णांना लस दिली गेली. त्यामुळे लसीबाबत जनजागृती करण्यात आरोग्य विभागाला अपयश आले आहे.
राज्यात इन्फ्लूएंझा रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये ‘एच-१ एन-१’ (स्वाइन फलू) व ‘एच-३ एन-२’ या विषाणूंची ज्यांना लागण झाली आहे, त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. यावर्षी राज्यातील सरकारी रुग्णालयांत २१ लाख रुग्णांची तपासणी केली असता, त्यापैकी पाच हजार ७२० संशयित रुग्णांना ऑसेलटॅमीवीर हे औषध दिले. तर आतापर्यंत २३२५ रुग्णांची चाचणी सकारात्मक आली असून, ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढती संख्या पाहता राज्याच्यावतीने यावर्षीपासून जोखीमग्रस्त रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयांत मोफत लसीकरण आयोजित करण्यात येते. हे लसीकरण दुसऱ्या, तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांसोबतच मधुमेह, उच्चरक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना फल्यू प्रतिबंधक लसीकरण करता येते.
नियमित मृत्यू परीक्षण
इन्फल्युएंझा ए, ‘एच-१ एन-१’ मुळे होणाऱ्या मृत्यूचे नियमित मृत्यू परीक्षण (डेथ ऑडिट) जिल्हा, महापालिका आणि विभागीय स्तरावर करण्यात येते. यातून झालेल्या मृत्यूंची कारणे शोधून सर्वेक्षण, रुग्णोपचार, संदर्भसेवा, क्षमता संवर्धन यासंदर्भात आवश्यक कृती योजना आखण्यात येतात. इन्फल्यूएंझा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज असून, राज्यात या आजारावरील ऑसेलटॅमीवीर औषधे आणि इतर साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. राज्यातील सर्व उपजिल्हा तसेच, जिल्हा रुग्णालयात इन्फल्युएंझा ए एच-१ एन-१ उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
प्रतिबंध अन् नियंत्रणासाठी उपाययोजना
– फल्यू सदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण
– फल्यूसदृष्य रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार
– राज्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसेच, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना
– उपचार सुविधा असणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांना स्वाईन फ्ल्यू उपचाराची मान्यता
– ऑसेलटॅमीवीर आणि इतर साधनसामग्रीचा पुरेसा साठा
– महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीची स्थापना
– सर्व खासगी औषध दुकानात ऑसेलटॅमीवीर उपलब्ध ठेवण्यासाठी आंतरविभागीय समन्वय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.