

पुणे, ता. ३ : वाचनाचे संस्कार नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासह वाचन चळवळ अधिक समृद्ध होण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त अनोखा विश्वविक्रम नोंदविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘सर्वांत मोठा पुस्तकांच्या छायाचित्रांचा ऑनलाइन अल्बम’ असा विश्वविक्रम ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविला जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन ‘सकाळ’च्या कार्यालयात करण्यात आले. यानिमित्त उपस्थितीत मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना.
वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त ‘सकाळ’च्या वतीने होत असलेला हा विश्वविक्रम वाचन चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. डिजिटल युगात वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण असून लहान मुलांपर्यंत हे संस्कार रुजविण्यासाठी अशा महोत्सवातून नवी दिशा मिळते.
- संदिपसिंग गिल,
पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक
पुस्तक महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत असून त्याचे स्वरूप वाढणार आहे. महोत्सवादरम्यान एका दालनात केवळ संविधानाची पुस्तके ठेवली जावेत. यांसह दरवर्षी दोन महापुरुषांचे समग्र वाड्मय असलेली दालने असावीत.
- लक्ष्मीकांत देशमुख,
ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष
हा महोत्सव जागतिक स्तरावरील असून त्याची व्याप्ती वाढतच आहे. महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या मराठी माणसांची संख्या मोठी आहे. त्याचा विचार करता विलासपूर, बडोदा, भोपाळ, हैदराबाद येथील नागरिकांनाही महोत्सवात सहभागी करून घेतले पाहिजे.
- भारत सासणे,
ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष
पुणेकर हे समीक्षक असून महोत्सवाद्वारे त्याचे वाचक म्हणून परिवर्तन होत आहे. विविध वयोगटांतून कोणते साहित्य वाचले जात आहे, याचे सर्वेक्षण करण्यात यावे. त्यातून वाचकांना काय आवडत आहे, हे स्पष्ट होर्इल.
- प्रा. मिलिंद जोशी,
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद
या महोत्सवानिमित्त पुण्याच्या मूळ संस्कृतीशी नाते जोडणारा उपक्रम होत आहे. काही वर्षांपूर्वी साहित्य आणि त्याअनुषंगाने होणारी चर्चा कानी पडण्यासाठी खूप कमी पर्याय होते. आता अशा उपक्रमांच्या माध्यमातून त्यात वाढ झाली आहे. पुणे हे वाचणारे शहर आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होर्इल.
- प्रवीण तरडे, अभिनेते व दिग्दर्शक
पुस्तक महोत्सवाचा उपक्रम आपल्याला आणि पुढील पिढीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मुलांमध्ये झालेले सकारात्मक बदल कायम राहण्यासाठी त्यांना गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना गोष्टी, नाट्य यात गुंतवून ठेवायला हवे.
- सलिल कुलकर्णी, गायक व संगीतकार
पुणे हे विद्येचे माहेरघर आहेच, आता ते पुस्तकांची राजधानी देखील बनत आहे. हा महोत्सव पुस्तक वेड्यांसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे. ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’ आणि ‘सकाळ’ यांचे खूप आभार.
- डॉ. अनंत सरदेशमुख, स्टार्टअप व्यवस्थापन सल्लागार
वाचनाबाबत शहरात चांगली जागृती झाली असून त्यात ‘सकाळ’ने सकारात्मक भूमिका बजावली आहे. या उपक्रमातून पुस्तकांचा मोठा खजिना उपलब्ध होणार आहे. तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होर्इल.
- कृष्णकुमार गोयल, व्यवस्थापकीय संचालक, कोहिनूर ग्रुप
पुणे हे शहर सुरूवातीपासूनच वाचनसंस्कृतीची राजधानी होती. या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील नामांकित लेखक, वाचक पुण्यात येणार आहेत. पुण्यातील वाचकांनाही यानिमित्ताने वेगळे आणि विस्तृत जग पाहायला मिळणार आहे.
- डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक-गायक-संगीतकार
वाचन संस्कृती निर्माण होण्यासाठी सुरु केलेला पुस्तक महोत्सव हा अनोखा उपक्रम आहे. सध्याच्या डिजिटल युगामध्ये पुस्तक वाचण्याची सवय कमी होत आहे. ही वस्तुस्थिती असताना तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे.
- ॲड. सुभाष मोहिते, अध्यक्ष, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन
पुणे हे विद्येचे माहेरघर आहेच. मात्र, आता पुस्तकांची राजधानी देखील बनत आहे, यासारखा दुसरा आनंद नाही. मी पुस्तक वेडा आहे. त्यामुळे अशा प्रकारचा पुस्तक महोत्सव माझ्यासारख्या पुस्तक वेड्यांसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे.
- डॉ. अनंत सरदेशमुख, स्टार्टअप व्यवस्थापन सल्लागार
पुस्तकाचे पान उघडले की एका नव्या जगाचे दार उघडते असे म्हणता येईल. वाचनाचे वेड हे मुलांना लागलेच पाहिजे. यामुळे आयुष्यात पुस्तकांचा आधार मिळतोच, त्याशिवाय एक नव्या जगाशी ओळखही होते.
- अनघा परांजपे-पुरोहित, वास्तुविशारद
पुस्तक महोत्सव हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. तर चला मग वाचूया...कारण वाचाल तर वाचाल.
- भूषण गोडबोले
पुढच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी या उपक्रमाचा खूप मोठा उपयोग होणार आहे. आताची पिढी पुस्तक वाचत नाही असे अजिबात नाही. फक्त त्यांची आवड बदलली आहे. त्यामुळे तसा आशय निर्माण होणे आवश्यक आहे.
- प्रांजली देशपांडे, शाश्वत शहरी विकास अभ्यासक
पुस्तक वाचण्याची आवड रुजणे हे फार महत्त्वाचे आहे. याची सुरुवात लहान मुलांपासून व्हायला हवी. या महोत्सवामुळे वेगवेगळ्या संस्कृती, चालीरीती आणि पद्धतीची ओळख होईल. अशा उपक्रमांमुळे गोष्टी सांगण्यास उत्तेजन मिळेल.
- गौरी देशपांडे, अभिनेत्री
पुस्तके जगाला ओळखण्याची एक खिडकी आहेत. संस्कृती आणि इतिहासाचा खजिना म्हणून पुस्तकांकडे पाहायला हवे. पुस्तके आपल्याला सभोवतालच्या जीवनाची ओळख देतात.
- रोनिता घोष, झिकोनी फाउंडेशन
आजच्या व्यग्र जीवनात लोक वाचनासाठी वेळ काढत नाहीत, परिणामी वाचनाची सवय कमी होत आहे. या महोत्सवामुळे उपलब्ध वेळेचा उपयोग करून लोकांना वाचनाची सवय लागेल. विविध क्षेत्रांतील माहिती, संस्कृती याबद्दल जाणून घेता येईल.
- प्रमोद दहितले,
कार्यकारी संचालक, पुणे जिल्हा सहकारी हाउसिंग सोसायटी आणि अपार्टमेंट्स फेडरेशन लिमिटेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.