भारतीयत्वाची भावना जपणे गरजचे
पुणे, ता. ७ : ‘‘राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेसह हिंदू विरुद्ध मुस्लिम असा अपप्रचार भाजपकडून केला गेला. अशावेळी देशाचे राजकीय आणि सामाजिक ऐक्य टिकविण्याचे आव्हान आहे. आगामी काळात समाजातील सर्व घटक एकत्रित करून भारतीयत्वाची भावना जपण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन माजी खासदार कुमार केतकर यांनी केले.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा-कर्तव्य-त्याग’ सप्ताहामध्ये ‘माझे जीवन, माझे संविधान’ या विषयावर केतकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर उपस्थित होते. या प्रसंगी ॲड. रमा सरोदे, विठ्ठल गायकवाड, मिलिंद अहिरे व प्रशांत धुमाळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केतकर म्हणाले, ‘‘स्वातंत्र मिळण्यापूर्वी संविधान निर्मितीसाठी घटना समिती नेमली गेली. स्वातंत्र्य मिळताना धर्माच्या आधारे देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे समितीवर दबाव होता की, देश केवळ हिंदुस्थान का होऊ शकत नाही. तेव्हाच घटनेने हिंदुस्तान असे जाहीर केले असते तर आजचा देश निर्माण झाला नसता. संविधानमुळे आज देश टिकलेला आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्य, काश्मीर, गोवा, पंजाब, पोदुच्चेरी हे देशापासून तेव्हाच धर्माआधारे तुटले असते. मात्र, तत्कालीन नेत्यांच्या धोरणात्मक कार्यामुळे भारत एकसंध झाला.’’
आज मोठ्या प्रमाणात धार्मिक द्वेष वाढला आहे. धर्मनिरपेक्ष लोकांना भाजपने लक्ष्य केले. पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करून काँग्रेसवर टीका केली जाते, असे सांगून केतकर म्हणाले, ‘‘हिंदू राष्ट्र निर्मिती स्वप्नासाठी भाजपने ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ शब्द यांना विरोध केला. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे.’’
यावेळी खोरे यांचे भाषण झाले. मोहन जोशी यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले. प्रवीण करपे यांनी आभार मानले.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

