म्हणा राम कृष्ण हरी, जगा आरोग्य निरोगी
पुणे, ता. ७ : टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत प्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांनी संवादात्मक कीर्तनातून स्वास्थ्याचा जागर केला. शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांचे आरोग्याबाबत प्रबोधन केले. ‘म्हणा राम कृष्ण हरी, जगा आरोग्य निरोगी’ अशी पुणेकरांना साद घातली.
‘सकाळ प्रस्तुत- सुहाना स्वास्थ्यम्’च्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ कीर्तनाने झाला. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या संचालिका मृणाल पवार यांच्या हस्ते पुरुषोत्तमदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बाल वारकऱ्यांनी केलेला टाळांचा गजर अन् मृदंगाच्या ठेक्यावर कीर्तन सुरू झाले. त्यात पुरुषोत्तमदादांनी उपस्थितांना टाळी वाजवित आणि मुखातून विठोबा-रखुमाई, ज्ञानेश्वर माउली, राम कृष्ण हरीचा गजर करत सहभागी करून घेतले. त्याने काही वेळातच वातावरण भक्तिमय बनले.
‘देवाशी तो पुरे एक प्रेमभाव’ या अभंगाचा अर्थ सांगत पुरुषोत्तमदादांनी शरीराचे आणि मनाचे स्वास्थ्याचे महत्त्व पटवून दिले. निरोगी आरोग्य, मानसिक शांती कशी राखावी, याबाबत मार्गदर्शन केले. आपले शरीर, मन चांगले असेल, तर आपण सर्व गोष्टी चांगल्या करू शकतो. गेलेले धन, मित्र असे सर्वकाही परत मिळेल. मात्र, मानवी जीवन, शरीर परत मिळणार नाही. त्यामुळे शरीराची काळजी घ्या, आनंदी राहा, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. सुमारे एक तास रंगलेल्या कीर्तनाच्या समारोपावेळी त्यांनी उपस्थितांना ‘ज्ञानोबा माउली’ असा गजर करत ठेका धरायला लावला. त्यांचे वेगळे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. कीर्तनात मृदंगाची साथ गंभीर महाराज अवचार यांनी, तर गायनसाथ प्रवीण महाराज सोळंके, सोमेश्वर महाराज उढाण यांनी साथ केली. आळंदी येथील रवींद्र महाराज गाडेकर यांच्या श्री कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे वारकरी विद्यार्थी सहभागी झाले होते.
पुरुषोत्तमदादा म्हणाले...
- भगवंताचे नामस्मरण करा, प्रत्येक गोष्टीवर मार्ग सापडेल
- आनंदी आणि सकारात्मक राहा
- तणाव टाळण्यासाठी मनाला शांत ठेवा
- शरीराची काळजी घ्या, नियमितपणे आरोग्य तपासणी करा
- ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करा’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

