मुलांच्या शाळेसाठी पालकांची ‘परीक्षा’

मुलांच्या शाळेसाठी पालकांची ‘परीक्षा’

Published on

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ११ : नामांकित शाळांमध्ये पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू झाली असताना आता शाळांच्या लाखोंच्या घरात गेलेल्या शुल्काने पालकांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. चांगल्या पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, तसेच शिक्षणासह अन्य कौशल्यांवर भर देणाऱ्या शाळांकडे पालकांचा ओढा आहे. परंतु, शाळांच्या शुल्काने गगनभरारी घेतल्याने शुल्क भरताना पालकांचे खिसे रिते होत आहेत.
डिसेंबर महिना म्हटलं, की मुलांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाकरिता शाळा निवडीसाठी पालकांची लगबग सुरू होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील नामांकित शाळांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, शाळांचे गगनाला भिडणारे शुल्क पाहून पालकांची चिंता मात्र वाढत आहे. मराठी शाळांचे शुल्क हे २० ते ४० हजार रुपयांच्या घरात असले, तरी पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे सर्वाधिक आहे. परंतु, इंग्रजी माध्यमाच्या आणि त्यातही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), ‘आयसीएसई’ शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी पालकांचा ओढा असल्याचे दिसून येते. या शाळांचे शुल्क हे एक ते चार लाख रुपये आणि त्यापेक्षा अधिक असल्याने पालकांची आर्थिक समीकरणे बिघडत आहे. दरम्यान, काही पालक शहरातील नावाजलेल्या अनुदानित शाळांसह वेगळ्या पद्धतीने अभ्यासक्रम शिकविणाऱ्या नामांकित शाळांमध्ये मुलांचे प्रवेश व्हावेत, याच्या प्रतीक्षेत आहेत. साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरपासून शाळांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते. त्याप्रमाणे आता पालक शाळांच्या प्रवेशासाठी धावाधाव करत असल्याचे चित्र दिसत आहे.

पालकांना भेडसावणारे प्रश्न
- वाढत्या स्पर्धेसाठी कोणती शाळा योग्य हे ठरविताना होतेय द्विधा मनःस्थिती
- शाळांचे शुल्क भरण्यासाठीही काढावे लागतेय कर्ज किंवा करावी लागते ओढाताण
- अनुदानित शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याकडे करताहेत दुर्लक्ष
- अनेक शाळांमध्ये शिक्षकांकडूनच खासगी शिकवणी वर्ग लावण्याबाबत होतीय विचारणा
- केंद्रीय विद्यालयात मोजकीच प्रवेशसंख्या असल्याने प्रवेश मिळण्यात अडचणी

असे आहे शाळांचे शुल्क (पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी)
माध्यमनिहाय/बोर्डनिहाय शाळांचे प्रकार : अंदाजे वार्षिक शुल्क
मराठी शाळा (राज्य मंडळ) : १२,००० ते २५,००० रुपये
इंग्रजी शाळा (राज्य मंडळ) : ३०,००० ते ७५,००० रुपये
सीबीएसई शाळा : ३०,००० ते ९०,००० रुपये
आयसीएसई शाळा : ५०,००० ते २,८०,००० रुपये
आयबीसह अन्य उच्चभ्रू शाळा : १,५०,००० ते ४,२५,००० रुपये


परिसरनिहाय शुल्कांमध्ये फरक
परिसर : शुल्कांत होणारे बदल
उच्च श्रेणी - औंध, बाणेर, बालेवाडी, हिंजवडी, ताथवडे, वाकड, चिंचवड, कोंढवा, मुंढवा, उंड्री
मध्यम श्रेणी - कोथरूड, वारजे, पुणे कॅम्प, येरवडा, शिवाजीनगर, गोखलेनगर, हडपसर
सर्वसाधरण श्रेणी - मध्यवर्ती भाग, संगमवाडी, कात्रज

आजकाल पालकांच्या गरजा बदलल्या आहेत. घरामध्ये एक किंवा दोन मुले असतात. त्यामुळे शाळांकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. चांगल्या पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान/सुरक्षा व्यवस्था, वातानुकूलित वर्ग खोल्या, चांगले शिक्षक आणि उपक्रम अशा पालकांच्या मागण्या असतात. त्याप्रमाणे शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करताना शाळांनाही मोठा खर्च करावा लागतो. त्यानुसार परिसरनिहाय शाळांच्या पायाभूत रचनेत आणि शाळेच्या शुल्कामध्येही फरक पडत असल्याचे दिसून येते.
- जागृती धर्माधिकारी, राज्य अध्यक्ष, इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल्स
असोसिएशन (आयईएसए)

खासगी शाळांमध्ये लाखोंच्या घरात शुल्क घेतले जात असले, तरीही तेथील शिक्षक हे प्रशिक्षित शिक्षक नसतात ही वस्तुस्थिती आहे. या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव असतो. जास्त शुल्क आकारणाऱ्या शाळा अन्य उपक्रमांच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारतात, परंतु विद्यार्थ्यांना त्या उपक्रमांचा पुरेपूर आनंद घेऊ दिला जात नाही. जास्तीत जास्त शाळांचे शुल्क किती असावे, हे ठरविणारी तरतूद शिक्षण शुल्क नियंत्रण कायद्यात असणे अपेक्षित आहे. त्यानुसार शिक्षण शुल्क नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.
- जयश्री देशपांडे, अध्यक्ष, पेरेंट्स असोसिएशन पुणे
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com