ठेकेदाराने पुरविलेल्या औषधांची तपासणी
पुणे, ता. ११ : राज्यातील विविध जिल्ह्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांना बनावट औषधांचा पुरवठा केलेल्या कोल्हापूरच्या ठेकेदारानेच पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तसेच ससून रुग्णालयाला औषधे पुरविल्याचे उघड झाले आहे. ‘विशाल एंटरप्रायझेस’ असे या पुरवठादार कंपनीचे नाव आहे. त्यामुळे त्यांनी पुरविलेल्या पाच प्रकारच्या औषधांची ससूनकडून तपासणी होईल.
याआधी कोल्हापुर, नागपूर येथील शासकीय रुग्णालयांत बनावट औषधांचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस खळबळ उडाली आहे. अंबाजोगाईमध्ये बनावट व अप्रमाणित ‘ॲझिथ्रोमायसिन ५००’ व ‘ॲमॉक्स’ या प्रतिजैविकांचा पुरवठा झाला आहे. याशिवाय ठाणे, वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयांतही असा पुरवठा झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी ससूनच्या अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन सूचना दिल्या.
या कंपनीने ससूनला डायक्लॉफिनॅक (वेदनाशामक), मीडिआझोलम (अपस्मार व्यवस्थापन), कॅल्शियम (हाडे बळकटीकरण), डेक्सामिथॅसोन (सूज कमी करण्यासाठीचे स्टेरॉईड) आणि मिझोप्रोस्टॉल (गर्भधारणा संबंधी) ही औषधे पुरविली आहेत. ही औषधे याआधी वापरण्यात आली आहेत. उर्वरित औषधांपैकी डायक्लॉफिनॅक (४०४० गोळ्या) मीडिआझोलमच्या (१४४०) कॅल्शियम (१२०), डेक्सामिथॅसोन (५ हजार) आणि मिसोप्रोस्टॉलचे (७,५००) अशी औषधे शिल्लक आहेत.
ही औषधे खरी आहेत की बनावट हे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए, औषध विभाग) तपासणी केल्यानंतरच कळेल. याबाबत पुणे ‘एफडीए’ चे सहायक आयुक्त दिनेश खिवंसरा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ससूनकडून अद्याप माहिती मिळालेली नाही.
........
ससून रुग्णालयाला विशाल एंटरप्रायझेसने पाच औषधांचा पुरवठा केला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये त्यांनी पुरविलेली व बनावट निघालेली औषधे येथे नाहीत. खबरदारी म्हणून औषधांची यादी तयार केली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी केली जाईल.
- डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय
.............
आम्ही जिल्हा रुग्णालयातील औषधांची तपासणी केली असून त्यात विशाल एंटरप्रायझेसने आम्हाला कोणत्याही औषधांचा पुरवठा केल्याचे आढळून आलेले नाही.
- डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

