

पुणे, ता. १३ ः शहराच्या छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये देखील खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा बघण्यास मिळतात. मुलांच्या प्रवेशासाठी पालकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. पालकांना कुठल्या शाळा अधिकृत आणि कुठल्या अनधिकृत याची माहिती होण्यासाठी जिल्हा परिषद अधिकृत शाळांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. अधिकृत शाळांची यादी पाहूनच पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व तालुके, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, नगरपरिषदा, कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील आयसीएसई, आयबी आणि सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत शाळांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर सोमवार (ता. १६) ते बुधवार (ता. १८) या कालावधीत प्रसिद्ध केली जाणार आहे.
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांचे प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक पालकांनी ही यादी पाहणे गरजेचे आहे. अनेकदा फसव्या प्रलोभनाला बळी पडून अधिकृत नसलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतात आणि नंतर मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे त्या अगोदरच पालकांनी सजग होण्याची गरज आहे. तर अनेक शाळा नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी फलक लावून जाहिरातबाजी करतात. त्या फलकावरील माहितीची खातरजमा केली पाहिजे. तसेच, शाळांच्या मान्यतेबाबत पालकांना तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, महापालिकास्तरावर प्रशासन अधिकारी, तर नगरपरिषद स्तरावर मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क करता येईल. शाळेचा यु-डायस क्रमांक, प्रथम मान्यता, खेळाची मैदान, स्वच्छतागृह आहे किंवा नाही, याची खात्री करून घेण्याची ही गरज आहे.
पालकांनी हे पाहावे...
- शाळेला मान्यता आहे किंवा नाही?
- शाळेतील भौतिक सुविधा आहेत का?
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सखी सावित्री समिती स्थापन केली आहे का?
- पालक शिक्षक समिती स्थापन केली का?
- शाळेत सीसीटीव्ही बसवलेले आहेत का?
- विद्यार्थ्यांच्या वाहन व्यवस्थेमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक केली का?
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र पडताळणी केली का?
मुलांचा प्रवेश हा अनधिकृत शाळेत घेतला जाणार नाही, याची खबरदारी प्रत्येक पालकांनी घेतली पाहिजे. तसेच, एकही अनधिकृत शाळा सुरु राहणार नाही, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानुसार सर्वेक्षण करून अनधिकृत शाळांचा शोध घेतला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या अधिकृत शाळा पाहून प्रवेश निश्चित करावा.
- संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.